राजगुरूनगर (हवेलीनामा ऑनलाइन)  येथील एसटी बसस्थानकावरून सुटणाऱ्या अनेक बसगाड्यांच्या फेऱ्या इंधन संपल्यामुळे रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. खाजगी वाहन चालकांनी या गोष्टीचा फायदा घेत थेट बसस्थानकातून प्रवासी उचलून नेल्यामुळे एसटीवर मोठी नामुष्की ओढवली.
          आज मंगळवारी  येथील एसटी बस आगारातील डिझेल संपल्यामुळे व इंधनाची व्यवस्था न झाल्यामुळे पहाटेपासून जाणाऱ्या मिरज, नाशिक, मुंबई, अक्कलकोट, सोलापूर, बार्शी, भीमाशंकर यांसह ग्रामीण भागातील गाडकवाडी, कवठे, पाईट, कडूस, पाबळ, वाडा या मार्गांवरील अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
       खाजगी प्रवासी वाहतूकदारांनी या संधीचा फायदा घेत अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करून   प्रवासी गाड्या भरभरून प्रवासी घेऊन गेले. या सर्व प्रकारामुळे एसटी महामंडळाच्या राजगुरुनगर आगाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुमारे सतरा हजार किलोमीटरच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *