पुणे (हवेलीनामा वृतसमूह) लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत घरगुती गॅस सिलेंडरमधून एका लोखंडी नोझलच्या सहाय्याने अवैध व धोकादायक पद्धतीने गॅस काढून त्याची छोट्या मोठ्या व्यावसायिक सिलिंडरद्वारे काळ्या बाजाराने विक्री करणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखा युनिट- ६ ने कारवाई करत सुमारे 2 लाख 24 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे युनिट हद्दीत गस्त करीत असताना पोलीस अंमलदार शेखर काटे यांना बातमी मिळाली की,लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील महादेव मंदिराच्या परिसरातील एका गोडाऊनमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून एका लोखंडी नोझलच्या सहाय्याने अवैध व धोकादायक पद्धतीने गॅस काढून त्याची छोट्या मोठ्या व्यावसायिक सिलिंडरद्वारे काळ्या बाजाराने विक्री करत आहेत. यावर लोणी काळभोर पोलीस व गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 6 च्या पथकाने कारवाई करत एकास अटक करण्यात आली आहे.

मदन माधव बामने (वय 20, रा. महादेव मंदीराजवळ, लोणी काळभोर, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार शेखर बाळासाहेब काटे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार शेखर काटे यांना लोणी काळभोर येथील महादेव मंदीराजवळ असलेल्या साईसृष्टी बिल्डींग पाठीमागील एका गोठ्यामध्ये एक व्यक्ती घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस काढून बेकायदा विक्री करीत आहे, अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट क्र. 6 व लोणी काळभोर पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. तेव्हा मदन बामने हा अवैधरित्या गॅस भरताना आढळून आला. या छाप्यात पोलिसांनी 31 हजार 900 रुपये किंमतीच्या एचपी कंपनीच्या 11कमर्शिअल गॅस टाक्या, 17 हजार 150 रुपये किंमतीच्या इंडेन कंपनी 7 घरगुती गॅस टाक्या, 13 हजार रुपये किमतीच्या पुष्पा कंपनीच्या 9 घरगुती वापराच्या रिकाम्या गॅस टाक्या, 51 हजार 450 रुपये किंमतीच्या 21 एचपी कंपनीच्या घरगुती गॅस वापराच्या टाक्या, 19 हजार 450 रुपये किंमत असलेल्या एचपी कंपनीच्या 21 घरगुती वापराच्या रिकाम्या गॅस टाक्या, 14 हजार 700 रुपये किंमतीच्या रिलायन्स कंपनीच्या 6 घरगुती वापराच्या गॅस टाक्या, 3 हजार 500 रुपये किंमतीच्या 2 एचपी कंपनीच्या लहान गॅस टाक्या, 86 हजार रुपये किंमतीच्या एकून 86 लहान वेगवेगळ्या लोकल कंपनीच्या गॅस टाक्या, 500 रुपये किंमतीचे एकूण 5 नग गॅस ट्रान्सफर करण्याचे लोखंडी नोझल, 200 रू चे एक पितळी नोझल, २ हजार रुपये किंमतीचे रेग्युलेटर पाईप साडेतीन हजारांचा एक इलेक्ट्रीक वजनकाटा असा एकूण सुमारे 2 लाख 24 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी मदन बामने याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, अनधिकृत भरलेले गॅस सिलेंडर हे लोणी काळभोर येथील त्याच्या जय मल्हार गॅस सर्व्हिस या दुकानात ठेवून ग्राहकांना विक्री करीत असल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस उपआयुक्त गुन्हे, निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – २ राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट – ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, नितीन मुंडे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश व्यवहारे, शेखर काटे, प्रतीक्षा पानसरे, सुहास तांबेकर यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *