पुणे (हवेलीनामा विशेष, शरद पुजारी) महाविकास आघाडी आणि महायुतीतील लढाईत बंडखोरांचे दुखणे वाढले असून त्यांना आवरताना दोन्ही आघाडय़ांतील प्रमुखांना फेस येत आहे.यामुळेच सध्या एक गोंडस शब्द प्रयोग प्रचलित झाला असून त्याला नाव दिलय ‘मैत्रीपूर्ण लढत’,राज्यात विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर आघाडी आणि महायुतीत जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला.दोन्हीकडे तीन प्रमुख पक्ष असल्याने जेष्ठ नेत्यांसमोर बाका प्रसंग निर्माण झाला.आपणासच उमेदवारी मिळाली पाहिजे यासाठी सर्व हातखंडे आजमावल्याचे दिसून आले.
राज्यात एकूण 288 जागांसाठी मतदान पार पडणार आहे.अनेक जागांवर आघाडी आणि महायुतीतील उमेदवार एकमेकांसमोर दंड ठोकून उभे आहेत. अशावेळेस युतीधर्म तसेच आघाडीधर्म पाळून बंडखोरांवर कारवाई करण्याऐवजी मैत्रीपूर्ण लढत अशी गोंडस नावाचा वापर वाढला.कारण लोकसभेच्या निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघात उबाठा शिवसेनेच्या आघाडीतील उमेदवाराच्या विरुद्ध राष्ट्रीय काँग्रेसचे बंडखोर उमेदवार निवडणूक लढले आणि जिंकून आले यालाच मैत्रीपूर्ण लढत असे नामकरण झाल.
यावेळी विधानसभा निवडणुकीत याच सांगली पॅटर्नची चर्चा चांगलीच रंगत असून याचा फटका सर्वच राजकीय पक्षांना बसताना दिसत आहे.पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा आदेश झुगारून आपला उमेदवारी अर्ज दाखल करुन बंडखोरांनी मोठे आव्हान निर्माण केले आहे.नामांकन अर्ज वापस घेण्याच्या दिवशी काय चित्र असेल हे स्पष्ट होईल.
