पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) कायम विनाअनुदानित असलेल्या शाळेत बालकांचा मोफत शिक्षणाचा हक्क अंतर्गत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे शासनाकडून मिळणारे अनुदान नाशिक येथील शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश काढण्यासाठी पुणे येथील शिक्षण संचालनालयील प्राथमिक शिक्षण विभागातील मुख्य लिपीक सुनिता रामकृष्ण माने यांना १२,६०० रुपयांची लाच स्विकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर बंडगार्डन पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार, नाशिक जिल्ह्यातील एका तक्रारदाराच्या कायम विना अनुदानित प्रकारच्या दोन शाळा आहेत. त्यात इयत्ता पहिली ते बारावीचे शिक्षण दिले जाते. त्यांच्या या दोन्ही शाळेत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात आर.टी.ई. (बालकांचा मोफत शिक्षणाचा हक्क) अंतर्गत प्रवेशित असलेल्या बालकांना २५% टक्के प्रवेश देण्यात आलेला आहे. या प्रवेशाकरीता या बालकांच्या शिक्षणापोटी त्यांची फी शासनाकडून शाळांना देण्यात येते. त्यानुसार सन २०२३-२४ कालावधीत तक्रारदारांच्या दोन्ही शाळेत आर.टी.ई. अंतर्गत २५% प्रवेश दिलेल्या बालकांची फी एकुण १२,६९,१४१/- रुपये तक्रारदारास शासनाकडून येणे बाकी होते. याबाबत उच्च न्यायालयाने शासनास आठ आठवडयाच्या आत ही रक्कम संबंधीत संस्था चालकास अदा करणेबाबत ऑगस्ट २०२४ मध्ये आदेश दिला होता. त्याप्रमाणे शासनाने सप्टेंबर २०२४ मध्ये रक्कमही वर्ग केली होती. ही रक्कम तक्रारदार यांना अदा करण्याबाबतचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. नाशिक यांना आदेश काढण्याकरीता लोकसेवक श्रीमती सुनिता माने यांनी मिळणा-या १२,६९,१४१/- रकमेच्या १% म्हणजे १२,६००/- रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली होती.
या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, लोकसेवक सुनिता माने यांनी वरील कामासाठी १२,६००/- रुपयांची लाच मागणी करुन, ती लाचेची रक्कम १२,६००/- (बारा हजार सहाशे रुपये) तक्रारदाराकडून पंचासमक्ष प्राथमिक शिक्षण संचालनालय कार्यालय, सेंट्रल बिल्डींग, पुणे येथे स्विकारले असता त्यांना ताब्यात घेण्यात आलेले असून, त्यांचेविरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक अनिल कटके करीत आहेत.
