उरुळी कांचन:- (हवेलीनामा वृत्तसेवा) वातावरणातील ओझोनचा थर हे नियतीने मानवाला दिलेले वरदान असून मानव मात्र त्याच्या बेताल वागण्याने निसर्गाला आणि पर्यावरणाला धोका पोहोचवत राहिला तर मानवाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यासाठी जागतिक ओझोन दिनाच्या माध्यमातून जाणीव जागृती करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष प्रा. के. डी. कांचन यांनी केले. येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र व रसायनशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक ओझोन दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे होते. यावेळी व्यासपीठावर वाणिज्य विभागप्रमुख प्रा.सुजाता गायकवाड, कला विभागप्रमुख डॉ. समीर आबनावे, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. आप्पासाहेब जगदाळे, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. अनुजा झाटे आदी होते. पुढे बोलताना कांचन म्हणाले की, पर्यावरण रक्षण व जतन ही आजची गरज बनली आहे. त्यातून ओझोन थराला असणारा धोका टाळणे शक्य होईल. त्यासाठी असा दिन साजरा करून जागृती व्हायला हवी. अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्राचार्य डॉ. बोऱ्हाडे यांनी सांगितले की, मानवाचे संरक्षण करणार्या ओझोन थराला माणसानेच धोकादायक स्थितीला आणून ठेवले आहे. हा थर जतन करणे शक्य आहे असेही ते म्हणाले. यावेळी डॉ. जगदाळे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या दिनाचे औचित्य साधून प्रा. कांचन यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच ओझोन, पर्यावरण आदी विषयांवर भित्तिचित्रे, मॉडेल व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्याचे उदघाटन देखील प्रा.कांचन यांच्या हस्ते करण्यात आले. या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. भित्त्तिचित्रे व मॉडेल स्पर्धेत अंकिता शेंबडे, गौरी वाल्हेकर, शिल्पा गावडे यांनी यश मिळविले तर रांगोळी स्पर्धेत स्नेहा सूर्यवंशी, प्रीती कांबळे यांनी बाजी मारली. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापकांचे व कार्यालयीन कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.
