पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] ऐन सणासुदीच्या दिवसात दूध भेसळ प्रकरण समोर आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लहान मुलांपासून जेष्ठांपर्यंत आवडीचा पदार्थ म्हणजे मिठाई.अनेक मिठाई पदार्थांमधे दूध वापरले जाते. त्यामुळे आता दूध भेसळ प्रकरण समोर आल्याने मिठाई खाण्याबाबत शाशंकता निर्माण झाली आहे. भेसळ युक्त दुधापासून बनलेल्या मिठाईमुळे आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो. यासंबंधी अन्न व औषध प्रशासनाने कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी पत्राद्वारे केली आहे.
आता लवकरच गणेशोत्सव,गौरी, दसरा व दिवाळी यासारखे मोठे सण काही दिवसांवर आहेत.याकाळात दुग्धजन्य पदार्थांची आवक वाढते. मात्र, दूधासारख्या पदार्थामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात आहे. असाच प्रकार नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात दूध भेसळीचा एक धक्कादायक प्रसंग उघडकीस आला आहे.सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील एका दूध संकलन केंद्रात कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारा कॉस्टिक सोडा आणि मिल्की मिस्ट या रासायनिक पावडर यांच्या मिश्रणातून बनावट दूध बनवले जात होते. दुधाला पूर्णान्नाचा दर्जा दिला आहे. मात्र, हे बनावट व भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. आता राज्यभरात सणासुदीचे दिवस सुरु होत आहेत. या दिवसांमध्ये अनेक मिठायांसाठी दूध वापरले जाते. या अशा भेसळयुक्त व बनावट दुधाचा वापर झाला, तर राज्यातील लाखो लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, अशी भीती सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या काही काळात दुधभेसळीच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणाने वाढ होत आहे. अन्न व औषध प्रशासनाने याकडे जातीने लक्ष दिले पाहिजे. राज्यभरातील दूध संकलन केंद्रांची तपासणी करण्याचे आदेश देऊन सर्वसामान्य जनतेला शुद्ध दूध उपलब्ध होईल, याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे.
परंतु अन्न व औषध प्रशासनाच्या कामाची व्याप्ती पाहता यात काही सुधारणा होईल याची शंका आहे.सध्या बहुतेक सर्वच तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भेसळयुक्त पदार्थांची सर्रास विक्री होते यातून आरोग्याच्या मोठ्याप्रमाणात तक्रारी निर्माण होत आहेत परंतु सुस्तावलेल्या या विभागाकडून काहीच हालचाल होत नाही.याकडे अन्न व औषध मंत्र्यांकडून ठोस कारवाई होणे अपेक्षित आहे.
