थेऊर [हवेलीनामा वृत्तसमुह] (पुजारी सर) हवेली तालुक्याला आमदारकी मिळवायची असेल तर आपापसातील सर्व मतभेद बाजूला सारून काम करण्याची आवश्यकता आहे नुकत्याच हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीवर सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांकडून मोट बांधून विजय मिळविल्यानंतर विधानसभेचे स्वप्न पडू लागले आहेत परंतु हे स्वप्न वास्तवात तेंव्हाच उतरेल जेंव्हा सर्व राजकीय मंडळींनी एकत्र चर्चा करुन राजकारणातील आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे.
हवेली तालुक्यातील सर्वांचा एकमेव ज्वलंत प्रश्न थेऊर येथील बंद अवस्थेतील यशवंत सहकारी साखर कारखाना होय.प्रत्येक निवडणुकीत यावर केवळ आश्वासन देवुन पाच वर्ष आरामात काढले जातात परंतु तळमळीने कार्य झालेच नाही.
गेल्या काही महिन्यांत यशवंतचे माजी संचालक पांडुरंग काळे यांनी पुढाकार घेऊन यशवंत पुन्हा पूर्ववत चालू करण्याच्या निर्धाराने हालचाली चालू केल्या आहेत. यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे आवश्यक आहे परंतु या प्रयत्नांना अडचण निर्माण होईल अशी कृती झाली तर पुन्हा ये रे माझ्या मागल्या या प्रमाणे परिस्थिती निर्माण होऊ शकेल.
शिरुर विधानसभेतून हवेलीला प्रतिनिधित्व मिळवायाचे असेल तर यशवंतच्या प्रश्नावर सर्वमान्य तोडगा निघणे आवश्यक आहे अन्यथा वेगवेगळ्या मतप्रवाहानुसार विचार करत राहिल्यास यातून काहीच साध्य होणार नाही.यासाठी जेष्ठ सभासदांनी मनभेद बाजुला ठेवुन एकत्रित बैठक घेण्याची गरज आहे.
