नवी दिल्ली [हवेलीनामा वृत्तसमुह] देशातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत असून महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ तसेच कर्नाटकमध्ये दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. अशात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रुग्णांना ट्रॅक करण्यासह कोरोना तपासण्या, लसीकरण वाढवण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आली आहे.
सध्या देशात इन्फ्लूएंझा सब टाईप एच३एन२ आणि कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य मंत्रालय आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने नुकतीच राज्यांना एक संयुक्त ॲडव्हाजरी जारी केली आहे. ज्यात सार्वजनिक आरोग्य उपायांचे पालन करण्यावर भर दिला गेला आहे. गर्दी टाळावी, शिंकताना अथवा खोकताना रुमाल/टिश्यूचा वापर करावा, गर्दीच्या आणि कोंदट ठिकाणी मास्कचा वापर करावा, हाताची स्वच्छता राखावी, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे, असे ॲडव्हाजरीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
