रत्नागिरी [हवेलीनामा वृत्तसमुह] काँग्रेसने देशाला लुटलं, ज्यांनी मुंबईत बाँबस्फोट घडवले त्यांच्यासोबत केवळ सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलात असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला.
काश्मीरमधील 370 कलम मोदींनी हटवलं, ज्यांनी राम मंदिराची उभारणी करून बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं, त्यांच्यासोबत जाण्याची आमची भूमिका चुकीची कशी असू शकते असा खडा सवाल त्यांनी विचारला. हा शिंदे गद्दार नाही, खुद्दार आहे, शिंदेच्या रक्तात बेईमानी नाही, आम्ही तुमच्यासारखं सत्तेसाठी मिंधे झालेलो नाही असं एकनाथ शिंदेनी सुनावले.
खेडच्या गोळीबार मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेला ते संबोधित करत होते. काही दिवसांपूर्वी खेडच्या याच मैदानावर उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर टीका केली होती. आता त्याच मैदानावरून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं.
एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आधी मुख्यमंत्री होणार नाही असं सांगितलं. त्यानंतर पवार सांहेबांनी सांगितलं असं म्हणत मुख्यमंत्री झालात. तेही ठिक, पण त्यानंतर तुम्ही हिंदुत्वाची भूमिका सोडली. बाळासाहेबांचा विचार बाजूला केलात आणि चक्क राहुल गांधी यांना पंतप्रधान करायला निघालात.
कोकणातल्या लोकांनी बाळासाहेबांवर प्रेम केलं, त्यांच्या विचाराला पाठिंबा दिला, तोच विचार आम्ही पुढे घेऊन जातोय, त्यामुळे कोकण आपल्यासोबत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कोकणातले सगळे शिलेदार आपल्यासोबत आहेत, त्यामुळे आम्हाला कुणाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही असंही ते म्हणाले.
तुम्ही खोके, गद्दार म्हणून कितीही पाप केलं, बाळासाहेबांच्या विचारांना संकुचित केलं असं एकनाथ शिंदे म्हणाले, गेल्या आठवड्यात या मैदानात एक फुसका, आपटी बार येऊन गेला. मी काही त्याला उत्तर द्यायला आलेलो नाही. तोच तो थयथयाट, आदळआपट याला उत्तर काय देणार? तोच खेळ सुरू आहे, फक्त जागा बदलली जातेय.महाराष्ट्राभर त्यांचे सर्कशीप्रमाणे खेळ होणार आहेत. खोके आणि गद्दार हे दोनच शब्द आहेत. त्याशिवाय तिसरा शब्द नाही. त्यामुळे त्यांना उत्तर देण्यात अर्थ नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, “आजच्या सभेला झालेली गर्दी पाहून त्यांना प्रश्न पडला असेल. कोकणाने बाळासाहेबांवर प्रेम केलं आहे. त्यांच्या मागे कोकणी माणूस आहे. आजही हा कोकणी माणूस त्यांच्या विचारांच्या पाठिशी आहे. त्यामुळे आम्हाला आता उत्तर देण्याची गरज नाही. कोकणी माणूस फणसासारखा, आतून गरासारखा हळवा असतो. एकदा शब्द दिला तर परत फिरत नाही.
