पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी करणा-या दोन मध्यस्थ खाजगी इसमांवर लाच मागणी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार, तक्रारदार यांचे कॉलेज असून, कॉलेज संबंधाने काही माहिती,माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी तक्रार केली असून, ते कार्यकर्ते ब्लॅकमेल करून खंडणी मागत असलेबाबतचा लेखी तक्रार अर्ज सासवड पोलीस स्टेशन येथे केला होता. त्या अर्जावरुन गुन्हा दाखल करण्याकरीता सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घोलप व घोलप यांचेवतीने गणेश जगताप, रा. सासवड यानी ३,००,०००/- रुपये लाच मागणी केल्याची तक्रार ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता, तक्रारदार याना त्यांचे अर्जावरुन सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याकरीता सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घोलप यांचेकरीता अक्षय सुभाष मारणे यानी तीन लाख रुपये लाचेची मागणी केली व त्या लाच मागणीस क्र. २ गणेश बबनराव जगताप यानी सहाय्य केले म्हणून दोघांविरुद्ध वरील प्रमाणे लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
अधिक तपास पुणे येथील पोलीस निरीक्षक संदिप व-हाडे तपास करत आहेत.
