पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] बारामती तालुक्यातील खांडज येथे गोबरगॅसच्या टाकीतील वायूमुळे चौघांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत एक जण अत्यवस्थ असून त्याला बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेत वडील व मुलासह चुलता व अन्य एकाचा मृत्यू झाला आहे.
प्रकाश सोपान आटोळे, प्रवीण भानुदास आटोळे, भानुदास आनंदराव आटोळे व बापूराव लहूजी गव्हाणे अशी मृतांची नावं असून प्रविण आटोळे तोल जाऊन गोबर गॅसच्या टाकीमध्ये पडला. टाकीतील कालवलेल्या शेणात तो अडकला. मुलाला वाचवण्यासाठी वडील भानुदास आटोळे आणि प्रकाश आटोळे टाकीत उतरले. पंधरा मिनिटांपेक्षा अधिक वेळ टाकीतून कोणीही बाहेर येत नसल्याचं पाहून तिघांना वाचवण्यासाठी शेजारी राहत असलेले बापुराव गव्हाणे टाकीत उतरले. मात्र दुर्दैवाने टाकीत उतरलेल्या चौघांचाही गुदमरून मृत्यू झाला. आज सकाळी साडे अकराच्या सुमारास खांडज गावच्या हद्दीत २२ फाट्याजवळील आटोळेवस्ती येथे ही दुर्दैवी घटना घडली.
चौघांनाही बारामतीतील सिल्वर जुबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले,परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे सांगितले. या दुर्दैवी घटनेत वडील, मुलगा, चुलता आणि शेजारी अशा चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेत आणखी एक जण अत्यवस्थ असून त्याला सिल्व्हर ज्युबिलीतून पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
