हवेलीनामा विशेषवृत्त [पुजारी सर] थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना हवेलीतील शेतकऱ्यांचा जीव की प्राण परंतु या कारखान्याचा खेळखंडोबा झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची अर्थिक घडीच विस्कळीत झाली आहे.सहकारी तत्त्वावर चालणारा कारखाना केवळ सुमार व्यवस्थापनाची शिकार झाला.कारखान्याची स्थावर मालमत्ता असूनही याला उभारी मिळण्यासाठी कसलीच मदत मिळू शकली नाही.यामुळेच गेली बारा वर्षांपासून याचे धुराडे बंद अवस्थेत आहे.
सहकार वाचविण्याची खरच राजकीय इच्छाशक्ती आहे का असा प्रश्न या निमित्ताने पडतो कारण सरकार कोणाचेही आले तरीही तालुक्यातील आम शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय मार्गी लागलेला नाही.सध्यस्थितीत कारखान्याकडे जवळपास 250 एक्कर शेती असून 12 गोडाऊन आणि काही इमारती आहेत कारखाना जानेवारी सन 2011 साली बंद पडल्यानंतर या उपलब्ध स्थावर जंगम मालमत्तून केवळ भाडेतत्त्वावर कोट्यावधी रुपये मिळाले असते परंतु यावर काहीच घडल नाही सर्व जागेवर सडत पडले परंतु ना शासनाकडून ना ज्यांच्या ताब्यात होता त्यांच्याकडून काहीच पावले उचलली गेली नाहीत.
हवेलीतील या कारखान्यावर जवळपास वीस हजार शेतकरी सभासद आहेत आणि हरीतपट्टा म्हणून तालुक्याची ओळख आहे.कारखाना उभारताना तात्कालीन खासदार आण्णासाहेब मगर आणि मनीभाई देसाई यांनी दूरदृष्टीकोनातून याची पायाभरणी केली.आपल्या हक्काचा कारखाना असावा कारण येथील शेतकऱ्यांचे मुख्य पीक मुळात ऊस असल्याने आपल्या शेतकऱ्यांना दुसर्यावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये हा उद्देश होता.त्याकाळात यशवंतचे वैभव खुप मोठे होते वाहतूक अंतर कमी आणि शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगाराची सोय मिळाली होती परंतु पुढे नेते मंडळींचा स्वार्थ हळुहळू डोक वर काढत गेला आणि कर्जाचा डोंगर वाढत गेला,शेवटी कर्जाच्या खाईत कारखाना बुडाला आणि त्यानंतर शेतकऱ्याच्या ऊसाचा प्रश्न उभा राहिला.
यातील शेतकऱ्यांत कळीचा विषय आहे तो कारखान्यावर नेमके कर्ज किती आहे,याची नेमकी आकडेवारी समोर येत नाही.कारखाना बंद पडला तेंव्हाची कर्जाची रक्कम काय होती तर कारखान्याकडे असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेचा विचार कसा झाला नाही.असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारले जातात.
नुकतेच राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारखान्यावर भेट दिली आणि बरेच वर्षापासून सुप्त अवस्थेत असलेल्या विषयाला पुन्हा नवसंजीवनी मिळणार का अशी आशा शेतकरी वर्गात निर्माण झाली.या भेटीदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून काय मार्ग काढता येईल यावर प्रदीर्घ चर्चा करुन शेतकरी सभासदांसोबत चर्चा घडवून मार्ग काढण्यासाठी येत्या 11 मार्च रोजी सर्वसाधारण सभेचे नियोजन केले आहे.
शेखर गायकवाड यांनी या भेटीदरम्यान महत्त्वपूर्ण विषयावर लक्ष वेधत स्थावर मालमत्ता भाडेतत्त्वावर देण्याबद्दल सुतोवाच केले गेल्या बारा वर्षाच्या कालावधीत हे गोडाऊन भाडेतत्त्वावर दिली असती तर मोठा महसूल मिळाला असता आणि कारखान्याची आताची जी दुरावस्था झालेली आहे ती टळली असली हे नमुद केले.
येत्या सर्वसाधारण सभेत यावर सकारात्मक निर्णय निघावा अशीच सर्वसामान्य शेतकरी सभासदांची अपेक्षा आहे कारण आपल्या शेतातील उभा ऊस कसा आणि कुठे द्यायचा हा प्रश्न मिटणार आहे.हवेलीतील ऊस उत्पादक शेतकऱ्याला आपला ऊस कसा तुटेल याची चिंता पडते.कधी कुट्टीला तर कधी खाजगी कारखान्यावर ऊस घालवावा लागतो तो पण बाजारभाव किती मिळेल याची शाश्वती नाही.त्यामुळे काहीही करा पण आमचा यशवंत पुन्हा पूर्ववत चालू करा अशी आर्त साद हा बळीराजा घालतो आहे.
