पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] कोरोनाचा दोन वर्षांचा काळ संपल्यानंतर आता सर्व गोष्टी पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. यानंतर जगभरात आरोग्य सेविका व परिचारिकांची अत्यंत कमतरता भासत असून अनेक मोठे देश विकसनशील देशांशी करार करून परिचारिका व आरोग्य कर्मचारी मागवीत आहेत. सिंगापूरसारख्या छोट्या राष्ट्रालासुद्धा २०३० पर्यंत सुमारे २४ हजारांपेक्षा जास्त परिचारिकांची गरज भासणार आहे. कोरोनाकाळात भरपूर काम, पण कमी पगार अशी स्थिती होती. त्यामुळे अनेक कर्मचारी काम सोडून गेले; पण आता यात फरक पडू लागला आहे. आता जगभरात अगदी जर्मनीपासून ते अरब अमिरातपर्यंत नर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठी मागणी आहे. त्यांना व्हिसा व भरपूर पगाराच्या ऑफर्स व अनेक सवलती देण्यात येत आहेत. आगामी वर्षात १ कोटी ३० लाख आरोग्य सेविका व परिचारिकांची आवश्यकता भासणार आहे, या दृष्टीने विचार करता भारतीय परिचारिकांना आपले भवितव्य उज्ज्वल करण्याची ही योग्य संधी आहे. जगातील चीन, मलेशिया, म्यानमार फिलिपाइन्स या देशात देखील भारतीय परिचारिका काम करीत आहेत. सध्या कमीत कमी २७ देशांत भारतीय परिचारिका सेवा देत आहेत. अनेक देशांनी त्यांना राहण्यासाठी फ्लॅट देण्याची सुद्धा तयारी दाखविली आहे. काही देशांनी त्यांना प्रवास खर्च, प्रशिक्षण खर्च देण्याची सुद्धा तयारी दाखविली आहे. भारतातील तरुणींनी या संधीचा फायदा घेतला पाहिजे.
