पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] आधुनिक युगामध्ये बंजारा समाजाची बंजारा बोलीभाषा व वेशभूषा आणि संस्कृती कला ही लोपपाबत चालल्याने बोलीभाषा व वेशभूषा कायम टिकून राहावी यासाठी बंजारा समाजाच्या वतीने किनवट तालुक्यातील कंचली येथे श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्ताने कंचली गावकऱ्यांच्या वतीने व गोरसेना गोडसेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने लेंगी स्पर्धेचे आयोजन केले होते.

या लेंगी स्पर्धेमध्ये मराठवाडा विदर्भ व तेलंगणा, आंध्र प्रदेश, अशा इतर राज्यातून देखील या लेंगी स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी अनेक लेंगी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता, अशी माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते व लेंगी स्पर्धा समितीचे मुख्य सूत्रधार सुभाष राठोड यांनी दिली आहे.

कंचली येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली लेंगी स्पर्धा पाहण्यासाठी बंजारा समाजातील प्रतिष्ठित नागरिक व बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. ही बंजारा लेंगी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुभाष स्वराजी राठोड, संजय शंकर राठोड, श्रीराम रेड्डी राठोड सरपंच, इंदल हिरामण राठोड,नरेंद्र मांगीलाल राठोड, शेषराव गंगाराम जाधव यांच्यासह गोरसेना गोरक्षकवाडी व गावातील नागरिकांनी परिश्रम घेतले.

