पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] अहमदनगर मधील आठरे पाटील पब्लिक स्कुल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी फी भरली नाही म्हणून गेल्या चार ते पाच दिवसांपासून शाळेत प्रवेश दिला नाही त्याना वर्गात बसण्यास मज्जाव करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शालेय व्यवस्थापनास विनंती करून देखील विद्यार्थ्यांना बाहेरच ठेवले जात आहे.
आतापर्यंत लाखो रुपये फी भरून केवळ किरकोळ फी शिल्लक असताना विद्यार्थ्यांना बाहेर ठेवलं जातं असल्याचे पालकांचे म्हणणे आहे,तरीही ती फी लवकरच भरण्याची तयारी पालकांनी दाखवली आहे.
विद्यार्थी नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता शाळेत येतात. परंतु ज्यांच्याकडे गेट पास नाही त्यांना शाळेत घेतले जात नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना गेटच्या बाहेरच थांबावे लागते. दुपारी दोन नंतर जेव्हा स्कुल बस येते तेव्हा ही मुले पुन्हा घरी निघून जातात. याकालावधीत विद्यार्थी शाळेच्या बाहेरच असतात त्यामुळे या काळात मुलांसोबत काही घटना घडली तर त्याला कोणास जबाबदार धरायचे असा संतप्त सवाल पालकांकडून करण्यात येत आहे. तर काही विद्यार्थ्याच्या पालकांनी तर दोन दिवसात फी देतो असं सांगून देखील त्यांच्या पाल्याला बाहेर ठेवल्याने पालकांचा संताप अनावर झाला आहे
मनपा शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी भाऊसाहेब थोरात यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, संबंधित शाळेला नोटीस काढली जाईल. मात्र चार ते पाच दिवस विद्यार्थ्यांना बाहेर थांबवले त्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान कसे भरून निघणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
