मुंबई [हवेलीनामा वृत्तसमुह] दिवाळीत शिधापत्रिकेवर देण्यात आलेला आनंदाचा शिधा आता गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त देखील १०० रूपयांत देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.याचा राज्यातील १ लाख ६३ हजार शिधा पत्रिकाधारकांना लाभ मिळणार आहे.
रेशनिंग दुकानातून अंत्योदय आणि केशरी कार्डधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केल्यानंतर राज्य शासनाकडून आणखी एक निर्णय आज सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या राज्यमंत्रिमंडळ बैठकीत घेतला.हिंदू नववर्षाच्या गुढीपाडवा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधा पत्रिकाधारकांना १०० रूपयांत ‘आनंदाचा शिधा’ देण्यात येणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
यासाठी रेशन दुकानांतून शंभर रुपयांत रवा, साखर, तेल, चणाडाळीचे किट दिले जाईल.
सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या काळात आपले सण साजरे करता यावेत यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या प्रकारे सहाय्य करण्याचा प्रयत्न होत आहे नुकत्याच गेलेल्या दिवाळीतील सणानिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले त्याच धरतीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
