पुणे [हवेलीनामा वृत्तस­मुह] पुणे अहमदनगर महामार्गावरील शिक्रापूर येथे एका कारला मालमोटारीने जोरात ठोसरल्याने घडलेल्या अपघातात डॉक्टर महिलेचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे डॉक्टर पती हे गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर चालकावर शिक्रापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघातात डॉ. सोनाली मच्छिंद्र खैरे (वय ३७) यांचा मृत्यु झाला असून त्यांचे पती डॉ. मच्छिंद्र नारायण खैरे हे गंभीर जखमी झाले आहेत. मालमोटार चालक पवन भगवान साठे याच्यावर गुन्हा दखल करण्यात आला आहे.

.. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर येथील खैरे हॉस्पिटलचे संचालक डॉ. मच्छिंद्र खैरे आणि डॉ. सोनाली खैरे हे दोघे आज १५ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास त्यांच्या कारमधून पुणे नगर महामार्गावरील साई सहारा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. पेट्रोल भरुन परतत असताना रस्ता ओलांडताना पुण्याच्या अहमदनगरच्या बाजूने वेगाने आलेल्या मालमोटारची खैरे यांच्या कारला जोरदार धडक बसली.या धडकेत कारचा पुढचा भाग पूर्णपणे आत घुसला. डॉ. सोनाली या बसलेल्या बाजूने ट्रकची धडक बसली होती. त्यामुळे डॉ. सोनाली त्यात पूर्णपणे अडकल्या. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती डॉ. मच्छिंद्र नारायण खैरे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघाताबाबत डॉ. कैलास बाळासाहेब बांदल यांनी शिक्रापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *