पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी पोलिसांच्या वेशात येत बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर येथे एकच खळबळ उडाली. यावेळी स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दीक बाचाबाची सुरू झाली.

तुपकर हे गेल्या तीन दिवसांपासून भूमिगत असल्यामुळे पोलीस प्रशासनावरील दबाव वाढला होता. आणि आज अचानक तुपकर यांनी पोलिसांच्या वेशात येऊन स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकत आत्मदहनाचा प्रयत्न केला. तुपकरांच्या या कृतीने मात्र एकच खळबळ उडाली.

सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रविकांत तुपकर यांनी ही टोकाची भूमिका घेऊन शनिवार म्हणजे आज, ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय किंव्हा शेती पिकविमा कंपनीच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई येथील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे जाहीर केले होते.

परंतु तुपकर बुलडाण्यात की मुंबईत कुठे आत्मदहन करणार, हे मात्र त्यांनी सांगितले नव्हते. एकतर आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला जगू द्या, नाहीतर आम्हाला आत्मदहन करू द्या. तेही करू देणार नसाल तर पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या घालून आम्हाला ठार करा. अशी कठोर भूमिका या आंदोलनाबाबत तुपकरानी मांडली आहे.

 

दरम्यान, तुपकरांच्या या भूमिकेमुळे संपूर्ण पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले होते. तसेच पोलिसांनी तुपकरांना नोटीसदेखील बजावली होती. मात्र, मागील तीन दिवसांपासून ते भूमिगत होते. त्यानंतर आज तुपकरांनी पोलिसांच्या वेशात बुलडाणा जिल्हाधिकारी परिसरात दाखल होते स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे येथे एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *