पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) सातबारा उताऱ्यावर नोंद लावाण्यासाठी शेतकरी दांपत्यास उपोषणास बसावे लागत आहे. चार दिवस उलटून देखील प्रशासन याची दखल घेत नाही ही यातील गंभीर बाब आहे.
याबाबतीत सविस्तर महिती अशी की,मुळशा तालुक्यातील अंबाडे येथील एका शेतकऱ्याची वडिलोपार्जित शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर चुकीच्या नोंदी आणि फेरफार रद्द करण्याच्या मागणीसाठी पती-पत्नी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत. या दाम्पत्याच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे परंतू अद्यापही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याची दखल देखील घेण्यात आली नसल्याचे या दाम्पत्याने सांगितले. विजय दगडू ओव्हाळ आणि वनिता विजय ओहाळ असे या उपोषणकर्त्या दाम्पत्याचे नाव आहे.
वडिलोपार्जित शेतजिमनीच्या सातबारा उताऱ्यावर महसूल विभागाकडून चुकीच्या नोंदी लागल्या गेल्या. शिवाय फेरफार पण चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप ओव्हाळ दाम्पत्याने केला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच दोषींवर कडक कारवाई करावी आणि आमच्या वडिलोपार्जित जमिनीवर असलेल्या पुर्वीच्या नोंदी करुन द्याव्यात, अशी मागणी विजय ओव्हाळ यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे.
