पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे नगर महामार्गावर विमाननगरमध्ये फिनिक्स मॉलमधील फर्स्ट क्राय कंपनीच्या शोरूमचालकाला माथाडीच्या नावाखाली जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला असून गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनने याप्रकरणात दोघांवर गुन्हा दाखल करुन एका सराईत गुन्हेगाराला अटक केली.

रविंद्र उर्फ रवि जयप्रकाश ससाणे (रा. चंदनननगर), मंगल सातपुते (रा. लोहगाव) यांच्याविरुद्ध विमानतळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील रविंद्र ससाणे याला अटक करण्यात आली आहे. याबाबत जितेंद्र राहुल राम (रा. पुनावळे, चिंचवड) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, अमोल पिलाने व त्यांच्या पथकाने केली आहे राम यांचे फिनिक्स मॉल येथील फर्स्ट क्राय कंपनीचे शोरुम आहे. त्याचे नूतनीकरणाचे काम सुरु होते. या कामासाठी लागणाऱ्या प्लायवूडचा ट्रक फिनिक्स मॉल येथे आला असता आरोपींनी ट्रकमधील प्लायवूड तक्रारदारांच्या कामगारांना खाली उतरून घेेऊ दिले नाही.तर आम्ही स्थानिक असल्याचे सांगून काही एक काम न करता ८ लाख रुपयांची खंडणी मागणी केली. तडजोडीअंती साडेचार लाख रुपयांची मागणी केली.यातील चेकद्वारे दोन लाख आणि उर्वरीत अडीच लाख रुपयांसाठी भेटून त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत त्यांनी पुणे पोलिसांकडे तक्रार केली असता त्याची चौकशी खंडणी विरोधी पथक दोन करत असताना चौकशीत माथाडीच्या नावाखाली खंडणी मागितल्याचे समोर आले. पथकाने गुन्हा दाखल करत एकाला अटक केली. तर, एकजण फरार असून, त्याचा शोध घेतला जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *