पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) आरटीई अंतर्गत राज्यातील खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 25 टक्के जागांवर प्रवेशासाठी राखून ठेवण्यात येतात यासाठीची पुढील वर्षासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणी दि 23 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत असणार आहे.नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालकांना अर्ज करता येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेत प्रवेशासाठी लागणार्‍या कागदपत्रांची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

          नामांकित खासगी शाळांमध्येआरटीई प्रवेश प्रक्रियेतून आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना मोफत प्रवेश घेण्याची संधी मिळते. यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत शाळांना 23 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत नोंदणी करावी लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांची नोंदणी पूर्ण करण्याची जबाबदारी प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांची असेल. ही नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच पालकांना मुलांच्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज दाखल करता येणार आहे, त्यामुळे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पालकांना अर्ज करता येण्याची
शक्यता आहे.
         पहिली ते आठवीच्या एकूण विद्यार्थ्यांच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी असलेल्या शाळेत आरटीई प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश मिळालेले असल्यास, त्या शाळांची नोंदणी प्रवेश प्रक्रियेत करण्यात येणार नाही. तसेच नव्या खासगी शाळांचा तीन वर्षांपर्यंत आरटीई प्रवेश प्रक्रियेत समावेश करू नये. या शाळांची शैक्षणिक तपासणी आणि पडताळणी पूर्ण केल्यानंतर संबंधित शाळेचा समावेश करण्यात यावा, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.
          आरटीई प्रवेशासाठी निवासी पुराव्या म्हणून रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज किवा टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक किंवा घरपट्टी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक आदींचा वापर करता येईल. भाडेकरार म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केल्याची प्रत आवश्यक आहे. शिक्षण विभागाकडून पत्त्याची पडताळणी करण्यात येईल. यावेळी पत्त्यावर मूल किंवा पालक राहात नसल्याचे आढळून आल्यास प्रवेश रद्द करण्यासोबतच कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *