पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) उद्योगांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या पुणे पोलीस, पिंपरी चिंचवड आयुक्त, पुणे ग्रामीण यांना स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.कारवाई करताना तो कुठल्या गटाचा आहे. कुठल्या पक्षाचा किंवा जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, याचा विचार न करता, उद्योगांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करा. त्यांच्या मुसक्या बांधा. त्यांना जेलमध्ये टाका, असे आदेश पोलिसांना दिले आहेत
राज्यात गुंतवणूकदार यायला तयार आहेत. ब्लॅकमेलर्सची इको सिस्टीम तयार झाली आहे. हे ब्लॅकमेलर्स उद्योजकांना त्रास देत आहेत. हे ब्लॅकमेलर्स मोठ्या प्रमाणात वसुली करतात. लायसन्स नसलेले फेक माथाड्यांच्या नावानं वसुली करतात, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
काही लोकं आम्हालाचं कंत्राट द्या. आम्ही सांगू त्या रेटला द्या. आम्ही काम करणार नाही. ते काम दुसऱ्याला देऊ. ही जी मानसिकता तयार झाली आहे त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याचे काम येत्या काळात करायचे असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना सांगितले.एक गुंतवणूकदार मला भेटले. त्यांनी सांगितलं की, वर्षभरापूर्वी सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करायचं ठरविलं होतं. पण, आम्हाला धमक्या मिळाल्या. वसुलीचे संदेश मिळाले. त्यानंतर ती सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कर्नाटकात घेऊन गेलो. अस होणार असेल, तर आपल्या युवकांच्या हाताला कस काम मिळणार ?.
