पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) सेरम इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा आदर पुनावाला यांच्या मातोश्री, स्व.विलू सायरस पुनावाला फाऊंडेशन यांच्या कडून, थेऊर येथील दोन प्राथमिक शाळेसह चिंतामणी विद्यालयास, शुद्ध पिण्याच्या पाण्याचे आर ओ मशीन देण्यात आले आहेत.यापैकी एक मशिन चिंतामणी विद्यामंदीर येथे बसविण्यात आले याचा लोकार्पण व उदघाटन सोहळा ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे, विठ्ठल काळे, राहुल कांबळे यांच्या हस्ते पार पडला यावेळी सुखराज कुंजीर, पांडुरंग काकडे, प्राचार्य बाळासाहेब नेवाळे, प्राध्यापक मधुकर खरात, जीवन शिंदे व इतर मान्यवरांच्या उपस्थित पार पडला.
या मशिनच्या माध्यमातून विद्यालयास, दररोज ५०० लिटर शुद्ध केलेले पाणी मिळणार आहे. बटन दाबल्यानंतर विध्यार्थ्यांना १०० मि.ली. पासून १ लिटर पर्यंत पाणी मिळणार आहे. हडपसर येथील सिरम इंस्टिट्यूट येथे शुद्ध केलेले पाणी या मशिनमध्ये दररोज येऊन भरले जाणार आहे. या मशीनमधील पाण्याची पातळी ८०% पर्यंत खाली आल्यावर, यातील संदेश यंत्रणेद्वारे सिरम कंपनीस माहिती मिळेल, माहिती मिळाल्यानंतर काही वेळात, कंपनीच्या टँकर मधून मशीनला पाणी पुरवठा केला जाईल. गेली अनेक दिवसांपासून चिंतामणी विद्यालयातील अंदाजे ७०० ते ८०० विद्यार्थ्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता. विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नेवाळे यांनी वेळोवेळी थेऊर ग्रामपंचायतकडे पाठपुरावा केला होता. केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून विद्यालयास आर ओ मशीन उपलब्ध झाले आहे.

थेऊर गावठाणातील जिल्हा परिषद शाळेसही मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे. येत्या काही दिवसात या शाळेत शुद्ध पाणी सुरु होईल. तसेच तारमळा जिल्हा परिषद शाळेसही पुढील काही दिवसात मशीन मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे, ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे यांनी सांगितले. यासाठी आदर पुनावाला क्लीन सिटीचे मुख्य-व्यवस्थापक कृष्णण कोमंडूर, उप-व्यवस्थापक मल्हार करवांदे, प्रकल्प प्रमुख रवींद्र ढोणे, क्षेत्र-व्यवस्थापक निलेश रामेकर यांचे सहकार्य लाभले युवराज काकडे यांनी यावेळी या सर्वांचे विशेष आभार मानले.
