थेऊर (हवेलीना मा ऑनलाईन) नायगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गायरान गट नंबर 35 मधील मोकळी जागा सार्वजनिक उपक्रमासाठी व गावच्या अत्यावश्यक बाबीसाठी वापर व्हावा या उद्देशाने डिसेंबर 2019 च्या ग्रामसभेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे बाबतचा विषय घेण्यात आला होता घरगुती व शेती पंप यासाठी सध्या गावची 3.50 मेगा वॅट विजेची मागणी आहे.शेतीसाठी केवळ आठ तास विज मिळते त्यातही अनियमितता असते.भविष्यातील शेती व उद्योगधंद्याची गरज विचारात घेता पाच ते सहा मेगा वॅट चा सौर ऊर्जा प्रकल्प झाल्यास ग्रामपंचायतीस उत्पन्न मिळेल त्यासाठी बारा ते पंधरा एकर जागेची आवश्यकता आहे प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर शेतकऱ्यांना सध्या असलेले 8/10 तासांचे भारनियमन कमी होऊन दिवसा 12 ते 14 तास वीज पुरवठा होऊ शकेल अशी माहिती राजेंद्र चौधरी यांनी ग्राम सभेत दिली होती. यावर ग्रामसभेने मान्यता दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांचेकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यासाठी आमदार अशोक पवार व खासदार अमोल कोल्हे यांनी शिफारसही केलेली आहे. प्रस्ताव प्रलंबित राहिला होता 15 ऑगस्ट 2022 रोजी माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी नायगाव येथील व्हीएसआय फार्मला भेट दिली त्यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले व प्रलंबित असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाची माहिती देण्यात आली त्यावेळी पवारांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याशी फोनवरून प्रकल्पाबाबत चर्चा केली व सहकार्य करण्यास सांगितले . त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमदार अशोक पवार, ग्रामपंचायत पदाधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी यांची जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन सौर ऊर्जा प्रकल्प बाबत संबंधित विभागांना आवश्यक त्या पूर्तता करणे संबंधी कळविण्यात आले. जिल्हाधिकारी व आमदार यांनी प्रकल्पासंबंधी सर्व प्रकारची मदत , मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
या भेटीच्या वेळी ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या रस्त्या संबंधीच्या अडीअडचणी पवारांनी समजून घेतल्या व सोडवल्या . नायगाव ते बीवरी रस्ता तीस फूट मंजूर केला व त्यांचे खासदार निधी मधून मदत करण्याचे जाहीर केले. ग्रामस्थांनी यावर आनंद व्यक्त केला. .
