पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) लोकसभा निवडणूकीस आणखी दोन वर्षाचा कालावधी बाकी असला तरीही महाआघाडीतील घटक पक्षात आतापासूनच कुरघोडी चालू झाली असून पुणे जिल्ह्यातील मावळ व शिरुर हे दोन मतदारसंघ लक्षवेधून घेणार हे नक्कीच. गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ मधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे तर शिरुर मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ अमोल कोल्हे विजयी झालेले आहेत.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना एकत्र निवडणुक लढले होते त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात शिवसेना लढली होती.यात शिरुर लोकसभा मतदारसंघात गेली दोन वेळा खासदार असलेले शिवाजीराव आढळराव पाटील डाॅ अमोल कोल्हे यांच्याकडून पराभूत झाले.तरीही आढळराव पाटील यांचा शिरुर लोकसभा मतदारसंघातील पगडा आजही तितकाच कायम आहे.आणि त्यांचा सर्वसामान्य जनतेशी प्रत्यक्ष संपर्क आहे त्यामुळेच त्याचा या मतदारसंघावर दावा अधीक असणार आहे.
त्याचबरोबर मावळ मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा पराभव केला होता.म्हणजेच या दोन्ही मतदारसंघात शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात सरळ लढत झाली आहे व यात एकमेकांना पराभूत देखील केले आहे.आता राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आहे आणि येणारी लोकसभा निवडणूक एकत्र लढायचे ठरले तर यात कोणाचा बळी जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.यावेळी भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी अशी मांडणी झाली तर आघाडीपढे अनेक पेच निर्माण होऊ शकतात तर इकडे भाजपसाठी मार्ग मोकळा होणार आहे.
मावळमधून आताच पार्थ पवार यांच्यासाठी मोट बांधण्याची तयारी चालू झाली असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी या जागेची मागणी केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे यावर वरिष्ठ नेत्यांनी तूर्तास सारवासारव केली असली तरीही जसजशी निवडणुक जवळ येईल तसतसा यात आणखीनच रंग भरलेला असेल.
