पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिरूर हवेली तालुक्यातील विकसित होत असणाऱ्या गावांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले यात लोणी काळभोर, उरुळी कांचन, कदमवाक वस्ती व थेऊर या शहरा लगतच्या मोठ्या लोकवस्तीच्या गावांमध्ये वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे झोपडपट्टी ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे या गावांमध्ये शहरात लागू असलेला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एस आर ए) फंड उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारची मागणी केली. या फंडाची केवळ शहरातच उपलब्धता होते परंतु शहरांची उपनगरे म्हणून विकसित होत असलेल्या मोठ्या गावात झोपडपट्ट्या वाढत असल्याने त्या ठिकाणी बहुमजली इमारती उभ्या करून झोपडपट्टीमुक्त उपनगरे करण्यासाठी ही सुविधा होणे आवश्यक असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.
तसेच नुकत्याच पुणे शहरास जोडलेल्या पूर्व हवेलीतील गावांपैकी उरुळी कांचन याठिकाणी ग्रामीण पोलीस विभागाचे पोलीस स्टेशन मंजूर झाले असून ते आणखी कार्यान्वित झालेले नाही त्यामुळे ते लवकरच कार्यान्वित करावे अशीही मागणी त्यांनी विधानसभेत केली.
उरळी कांचन येथील पोलीस स्टेशन अंतर्गत ज्या गावांचा समावेश होणार आहे त्यासंदर्भात आजही नागरिकांमध्ये मोठी संभ्रमावस्था निर्माण झालेली असून कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबा, थेऊर या गावांचा समावेश नेमका या पोलीस स्टेशनमध्ये होणार की ही गावे शहरात राहणार याबद्दल नागरिक आजही चर्चा करताना दिसत आहेत त्यामुळे उरुळी कांचन पोलीस स्टेशन मंजूर झाल्यानंतर उपलब्ध होणारे पोलीस कर्मचारी व त्या अंतर्गत येणाऱ्या गावांची लोकसंख्या या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा ऐकण्यात येत आहे.
वाघोली गावाचा पुणे महानगर पालिकेत समावेश झाल्यानंतर तेथील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी शासनाचा अतिरिक्त फंड उपलब्ध व्हावा अशी मागणी आमदार पवार यांनी विधानसभेत मांडली यामध्ये घनकचरा पाणीपुरवठा आरोग्य अशा वेगवेगळ्या विभागासाठी हा फंड उपलब्ध व्हावा अशी मागणी त्यांनी केली तसेच पुणे महा मेट्रो वाघोली पर्यंत यावी असा मानस वाघोली करांचा असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात सकारात्मक निर्णय दिला असून ही मेट्रो वाघोली पर्यंत आल्यास त्याचा नक्की सर्वसामान्य जनतेला उपयोग होणार आहे व शहराच्या प्रवेशमार्गात होणारी कोंडी कमी होण्यास याचा निश्चित उपयोग होणार आहे असे आमदार पवार यांनी सांगितले.
