पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) देशातील आम नागरिक आरोग्य सेवेसाठी किती आतूर आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या शासनकर्त्याकडून ज्याकाही अपेक्षा आहेत त्याची खरोखरच पूर्तता होते का याचा प्रत्येय नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत सहाय्यभूत साधनांच्या मोफत वाटपासाठी पूर्व तपासणी नोंदणी शिबिरातून अधोरेखित झाले.आपला देश लोकसंख्येने विशेषतः तरुण लोकसंख्येने सधन आहे परंतु नागरिकांचे राहणीमान तपासले तर आजही अनेकजण मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. मग अशा नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कोणता प्रयत्न केला जाऊ शकतो याचे चिंतन तथाकथित राजकारण्यांनी करायला पाहिजे.
पूर्व हवेलीतील लोणी काळभोर,कदमवाकवस्ती, थेऊर,सोरतापवाडी,कुंजीरवाडी,को लवडी,उरुळी कांचन वळती, शिंदवणे,तरडे,भवरापूर, नायगाव, पेेठ या गावांसह अन्य गावासाठी दिव्यांग नागरिकांनासह जेष्ठ नागरिकाांना केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत मोफत उपकरणे वाटप करण्यात आले यासाठी कुंजीरवाडी येथील जिजाऊ मंगल कार्यालयात शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या अगोदर अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्या मदतीने जेष्ठ नागरिक असलेल्या तसेच दिव्यांग नागरिकांची माहिती गोळा करण्यात आली होती.परंतु अशा नागरिकांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया अपुरी राहिली त्यामुळेच इथे त्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले.
या शिबिरात हजारो लाभार्थ्यांनी गर्दी केली होती प्रत्येय ग्रामपंचायतीचे कर्मचारी येथे ऑनलाईन माहिती भरुन घेत होते परंतु जेष्ठ नागरिकांना मात्र रांगेत ताटकळत बसण्याची वेळ आली.यावरुन प्रत्येय गावातील ग्रामपंचायत सदस्य,पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांनी वेळोवेळी आपल्या प्रभागातील नागरिकांची सर्व माहिती तयार करुन शासकीय सुविधा घरापर्यंत पोहोचवल्या तर याचा त्यांना फायदा होणार आहे. परंतु अशी जागरुकता निर्माण होणे आवश्यक आहे जी सध्यातरी जाणवत नाही.
