किरण खुडे
राजगुरुनगर : (हवेलीनामा ऑनलाइन) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगुरूनगर येथील पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी राज्याच्या नगरविकास मंत्रालयाकडून ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, लवकरच या कामाचा प्रारंभ होणार असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीचे संतोष वसंत डोळस यांनी दिली.
          राजगुरुनगरच्या एसटी बसस्थानकासमोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. या परिसराची स्वच्छता आणि सुशोभिकरण व्हावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांनी व समितीच्या वतीने शासनाकडे केली होती. त्यानुसार डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून या परिसराचे सुशोभिकरण करण्याकरीता ६२ लाख, चार हजार, ७९७ रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे पत्र जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून राजगुरुनगर नगरपरिषदेला प्राप्त झाले आहे.
       डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही या परिसरात झालेले अतिक्रमण, हातगाडी व पथारी व्यावसायिकांची झालेली गर्दी यामुळे पुतळ्याचा परिसर काहीसा दुर्लक्षित होता. डॉ. आंबेडकर जयंती, महानिर्वाण दिन तसेच स्वातंत्र्यदिन प्रजासत्ताक दिन यावेळी विविध संस्था, राजकीय पदाधिकारी, नेते व नागरिकांच्या वतीने अभिवादन  कार्यक्रम होतात. प्रत्येक वेळी या परिसराच्या  सुशोभीकरणाबाबत केवळ चर्चा होत होत्या. परंतु ठोस निर्णय घेतला जात नव्हता. समितीने केलेल्या पाठपुराव्याला यश आल्यामुळे भावी काळात या परिसराचा कायापालट होणार असून राजगुरूनगरच्या दर्शनी भागात असलेल्या हुतात्मा राजगुरू, सुखदेव आणि भगतसिंग यांच्या पुतळा परीसराप्रमाणेच हा परिसर देखील मनमोहक होणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले. निधीची उपलब्धता झाल्यामुळे नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून लवकरच या परिसराचा कायापालट होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. निविदा प्रक्रीया पुर्ण करुन लवकरच या परिसराचे सुशोभिकरण केले जाणार आहे. या सुशोभीकरणामध्ये परीसराला संरक्षक भिंत, आकर्षक प्रवेशद्वार, बगीचा, परिसराचे विद्युतीकरण तसेच डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील काही महत्वाच्या घटना सांगणारी आकर्षक भित्तीचित्रे रेखाटली जाणार आहेत अशी माहिती संतोष वसंत डोळस यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *