पुणे ( हवेलीनामा वृत समूह )
श्री गणेशाचे तीन अवतार सर्वसाधारणपणे मानले जातात. या तिन्ही अवतारांची उत्पत्ती ही वेगळी आहे आणि वेगवेगळ्या तिथींना बाप्पाचा जन्म झाला. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा दिवस हा भाद्रपद शुक्ल चतुर्थी हा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा दिवस हा माघी शुक्ल चतुर्थीचा म्हणजे गणेश जयंतीचा दिवस. असे साधारण तीन वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. याबद्दल आणखी एक सांगितले जाते ते असे की, गणपतीने असुराचा वध करण्यासाठी तीनवेळा वेगवेगळे अवतार घेतले ते हे तीन अवतार असे देखील मानले जाते. यातील तिसऱ्या आणि माघ महिन्यातील अवताराविषयी असे सांगितले जाते. स्कंद पुराणातही याचा उल्लेख करण्यात आला आहे. असे म्हणतात या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारले. त्याच्या वधासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक अवतार घेतला म्हणून हा जन्म माघी गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो.
माघ शुद्ध चतुर्थी ही तिथी श्रीगणेश जयंती म्हणून साजरी होते.
गणेश किंवा गणपती ही देवता म्हटली की मराठी लोकांचा उत्साह ओसंडून वाहू लागतो आणि यात आपण हे पडताळून पाहत नाही की माघात गणेश जन्म जर झालाय तर मग भाद्रपदात कोणाचा जन्म झाला ? हा प्रश्न मला फार पूर्वी पडला होता आणि याचं उत्तर मला महत्प्रयासाने मिळालं होतं.
आता उंदीरमामा, मोदक, लाडका बाप्पा हे सुरू होईल. माघी सार्वजनिक गणेशोत्सवही होईल पण यात आपण नक्की कुठल्या देवाचा जन्मसोहळा साजरा करीत आहोत, ही जी मूर्ती आपण उत्सवमूर्ती म्हणून घडवलेली आहे, ती बरोबर आहे का, याचं भान मात्र राहणार नाही.
मूषक वाहन असणारा, मोदक आवडणारा, आपला अती लाडका बाप्पा हा पार्वतीचा मुलगा, ज्याचा जन्म आपण भाद्रपदात अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करतो. तो जन्म सोहळा बरोबरच…
माघात ज्याचा जन्म आहे, तो कश्यप ऋषी आणि माता अदिती यांचा पुत्र “महोत्कट विनायक”. या विनायकाचं वाहन मूषक नाही तर सिंह आहे. त्याला दहा हात आहेत. कृतयुगात माध्यान्हीला हा अवतार झाला.
तेव्हा आता माघ शुद्ध चतुर्थीला श्रीगणेश जयंती म्हणताना ही विनायकाची जयंती आहे, ज्याचं नाव महोत्कट असं आहे, तो कश्यप – अदिती पुत्र आहे, हे ध्यानात ठेवावे.
(साभार)
