मुंबई (हवेलीनामा ऑनलाइन) मुंबै बँकेच्या अध्यक्ष- उपाध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी विकास आघाडीने आपले वर्चस्व सिद्ध करत भाजपचा पराभव केला आहे. बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिद्धार्थ कांबळे यांनी भाजपचे प्रसाद लाड यांचा ११ विरुद्ध ९ मताने पराभव केला.तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर व भाजपचे विठ्ठल भोसले यांना समसमान मते पडल्याने ईश्वर चिठ्ठीच्या आधारे भोसले विजयी झाले. शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीने आजच्या या अटीतटीच्या लढाईत भाजपचा पराभव केला. दरम्यान अध्यक्षपद यंदा राष्ट्रवादीकडे तर पुढील वर्षी शिवसेनेकडे सोपवले जाणार असल्याचे यावेळी ठरवण्यात आले दरम्यान अध्यक्ष पदासाठी निवडणुकीत पराभव समोर दिसताच मुंबै बँकेचे विद्यमान अध्यक्ष, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी माघार घेत उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. महा विकास आघाडीच्या विजयात शिवाजीराव नलावडे, नंदकुमार काटकर , आमदार सुनील राऊत व संदीप घनदाट यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
महाविकास आघाडीचा संचालकांनी आज शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर व सुरज चव्हाण यांची भेट घेऊन निवडणुकीच्या रणनीतीबाबत शिक्कामोर्तब केले.यावेळी सर्वानुमते अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे जाहीर करण्यात आले मुंबै बँक संचालक पदाच्या २१ पैकी १७ जागांवर बिनविरोध उमेदवार विजयी झाले होते. विद्यमान संचालक मंडळावर राष्ट्रवादी व कॅाग्रेस ८ , भाजपचे ९ तर शिवसेनेचे ३ उमेदवार विराजमान आहेत. त्यामुळे आज होणारी अध्यक्ष- उपाध्यक्ष पदाची निवडणूक कमालीची चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. अध्यक्षपदासाठी भाजप- राष्ट्रवादीमध्ये स्पर्धा सुरू झाली असतानाच शिवसेनेची तीन मते निर्णायक ठरली.अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी किमान ११ मतांची गरज असून भाजप तसेच राष्ट्रवादीला अध्यक्ष- उपाध्यक्षपद मिळवण्यासाठी किमान दोन मतांची गरज होती.मुंबै बँक संचालकपदी भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,आमदार प्रसाद लाड, आनंद गोळे, कविता देशमुख, विनोद बोरसे सोनदेव, पाटील, नितीन बनकर ,अनिल गजरे, काँग्रेसचे संदीप घनदाट, पुरुषोत्तम दळवी, जिजाबा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ कांबळे, नंदकुमार काटकर, जयश्री पांचाळ, व इतर विष्णू घुमरे तर शिवसेनेचे आमदार सुनिल राऊत, अभिषेक घोसाळकर, शिल्पा सरपोतदार सद्या कार्यरत आहेत.
