थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) प्राधिकरणातील एका रजिस्टर्ड संस्थेमध्ये रजिस्टर्ड करारनामा करून घर घेतले आहे. त्यास प्राधिकरणाने ‘ना हरकत’ दाखला दिला आहे व आमच्या नावाने हस्तांतर आदेश दिला आहे. त्यानंतर सोसायटीमध्ये आमच्या नावावर सभासदत्व दिले आहे. घरपट्टी, पाणीपट्टी, वीज मीटर इत्यादी माझ्या नावावर हस्तांतरित झालेले आहे. तरी आता तलाठी यांच्या कार्यालयात जुने सभासद त्यांच्या जागी माझे नाव येण्यास काय करावे लागेल? सिटी सर्वे ऑफिस मध्ये माझ्या नावाची नोंद होण्यास काय करावे लागेल?
उत्तर: स्थावर मालमत्ता खरेदी केल्यानंतर बऱ्याचशा बाबींची आपल्याकडून पूर्तता झालेली दिसते. स्थावर मालमत्ता खरेदी केल्यानंतर सरकारदरबारी आपल्या नावाची मालक म्हणून होणे अत्यंत आवश्यक असते. घरपट्टी, पाणीपट्टी, वीजमीटर व बिल आपल्या नावावर हस्तांतरित झाले असले तरी या गोष्टी जागेची मालकी निर्देशीत करत नाहीत.
प्राधिकरणाच्याबाबतीत वेगळा कायदा लागू होतो व प्राधिकरणाच्या दप्तरी मालकी किंवा भाडे पट्टेदार म्हणून झाली की आपली मालकी प्रस्थापित होऊ शकते. तसेच, तलाठी ऑफिसमध्ये व सिटी सर्वे ऑफिसमध्ये नोंद करायची असल्यास करारनाम्याची प्रत व प्राधिकरणाचे हस्तांतरणाचे पत्र विहित नमुन्यातील अर्जासोबत दिल्यास आपल्या नावे मालकी हक्काची नोंद होऊ शकते.
