कदमवाकवस्ती (हवेलीनामा ऑनलाइन) हिंदवी स्वराजचे घर म्हणजे गडकिल्ले,याच गडकिल्ल्यांमुळे आज आपण घराघरात दिवाळी साजरी करतोय. मात्र तेच गडकिल्ले ऐन उत्सवाच्या काळात अंधारात असतात. एकांतात असलेल्या या ऐतिहासिक गडकिल्ल्यावर देखील दिवाळी साजरी व्हावी म्हणूनच एक प्रवास सह्याद्रीचा व साम्राज्य सेवा फौंडेशन परिवारकडून पुरंदर तालुक्यातील सोनोरी येथील मल्हारगडावर दीपोत्सव साजरा करून पुन्हा एकदा शिवशाहीच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.यावेळी किल्ल्यावर फुलांनी केलेली सजावट आणि दिव्यांच्या प्रकाशात महादेव मंदिर उजळून निघाले. मंदिराचा गाभारा आणि मंदिराच्या बाहेर रांगोळी
काढण्यात आली व किल्ल्याच्या महादरवाजावर तोरण लावून बाकी सर्व फुलांनी सजविण्यात आले होते.यावेळी शिवभक्तांनी हातात मशाली घेऊन नाचण्याचा आनंद साजरा केला. कार्यक्रमास लहान मुलांपासून जेष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवला.
एक प्रवास सह्याद्रीचा व साम्राज्य सेवा फौंडेशन या
स्वयंसेवी संस्था गेल्या दोन वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील गड किल्ले यांचे संवर्धनासाठी झटत असून संस्थेमार्फत वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन करून गडकिल्ल्यांसंदर्भात जनजागृती केली जात आहे.आज पर्यंत या संस्थेने राजगड,तोरणा,मल्हारगड,सिंहगड या सर्व किल्ल्यांवर अंदाजे तीन हजार झाडे लावण्यात आली असून गड किल्ल्यांवर एक कोटी वृक्षारोपण करण्याचा निर्धार त्यांचा असल्याचा यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
