पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या ७ विद्यार्थ्यांनी विश्वशांतीसाठी पुणे ते कन्याकुमारी असा १५०० कि मी चा १५ दिवसाची सायकल यात्रा करत आहेत. एमआयटी एडीटी व विश्व शांती घुमट लोणी काळभोर येथून या यात्रेला एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष व कुलगुरू प्रा.डॉ. मंगेश कराड यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरूवात केली. यावेळी विद्यार्थी विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र पूजेरी, क्रीडा विभागाचे संचालक प्रा. पद्माकर फड, डॉ. सुदर्शन सानप, मोहन मेनन आणि इतर मान्यवर उपस्थितीत होते.
यात्रेला सुरुवात करताना प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले की, स्वामी विवेकानंदांनी दिलेल्या शारीरिक व्यायामाच्या मंत्र विद्यापीठाच्या माध्यमातून पूर्ण केला जात आहे. यात्रेत ७ विद्यार्थ्यांच्या चमू विश्वशांतीचा संदेश देण्याचे कार्य करेल. ही यात्रा एमआयटी एडीटी व विश्व शांती घुमट लोणी काळभोर येथून सुरूवात होऊन शेवट विवेकानंद रॉक मेमोरिअल कन्याकुमारी येथे होईल.या मोहिमेत एमआयटी एडीटी विद्यापीठाचे रोईंग कोच संदीप भापकर सायकलिंग मोहिमेचे मार्गदर्शन करत आहेत. यात एआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग चे विद्यार्थी सतीश काचे, भाग्येश भागवत, स्कूल ऑफ फूड टेक्नॉलॉजी चे कोंडा वेंकट साई, पृथ्वीराज घोरपडे, क्षितिज माळी, सूरज कोठावळे इत्यादी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
