बारामती (हवेलीनामा ऑनलाइन) सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शैलेश रासकर यांनी त्यांना मिळालेल्या भत्त्याची रक्कम सुप्यातील प्राजक्ता मतिमंद निवासी शाळा तसेच खंडोबाच्यावाडीतील खंडोबा देवस्थानला दिली.
रासकर यांना भत्त्यापोटी एक लाख रूपये मिळाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार सोमेश्वर साखर कारखान्यावर एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी प्रत्येकी ५० हजार रूपये प्रमाणे धनादेश अजित पवार यांच्या हस्ते त्याना देण्यात आले. सुपे येथील जीवन साधना फाऊंडेशन संचलित प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यायलाचे संस्थापक जयराम सुपेकर व खंडोबाचीवाडी येथील खंडोबा मंदीर जिर्णोद्धारासाठी बाबा फरांदे यांना हे धनादेश देण्यात आले.
समाजातील गरजूंना मदतीची रासकर यांची भूमिका कौतुकास्पद आहे. अशा शब्दात श्री.पवार यांनी रासकर यांच्या या उपक्रमाचा गौरव केला. कारखान्याच्या अभ्यास दौऱ्याच्या वेळी कामगार कल्याण अधिकारी दत्तात्रेय माळशिकारे यांनी तालुक्यातील गरजू संस्थांना आर्थिक मदत असल्याचे सांगितले होते. त्यानुसार श्री.रासकर यांनी मासिक सभेचा भत्ता सुमारे दोन वर्षे उचलला नव्हता. ही साठलेली भत्त्याची रक्कम त्यांनी श्री.पवार यांच्या हस्ते दिली.
याप्रसंगी सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर आदी उपस्थित होते.
शाळेला आर्थिक, वस्तुरूपी मदतीची गरजः
शाळा आर्थिक संकटात असताना श्री.रासकर यांची मदत बहूमोल असल्याची माहिती जयराम सुपेकर यांनी दिली. कोरोना महामारीच्या साथीमुळे गेल्या दीड-दोन वर्षापासून शाळा मदतीपासून वंचित आहे. अद्याप सरकारी अनुदान मिळाले नसल्याने शाळा आर्थिक अडचणीत आहे. शाळेला आयकर ८०जी सवलत आहे. दानशूर संस्था व व्यक्तींनी आर्थिक किंवा वस्तुरूपी मदत करण्याचे आवाहन प्राजक्ता विशेष शाळेच्यावतीने करण्यात आले आहे.
