किरण खुडे
राजगुरुनगर (हवेलीनामा ऑनलाइन) एसटी महामंडळाच्या राजगुरुनगर आगाराच्या प्रवेशद्वारावर संघर्ष एसटी कामगार युनियनच्या वतीने आक्रोश सभा घेण्यात आली. एसटी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अनियमित व कमी वेतनामुळे काही कर्मचाऱ्यांनी आयुष्याला कंटाळून  आत्महत्या केल्यामुळे, प्रशासनाला विचार करण्यास भाग पाडण्यासाठी आक्रोश सभा घेण्यात आल्याचे संघर्ष एसटी कामगार युनियनचे राजगुरुनगर आगाराचे सचिव आर. आर. माने यांनी सांगितले.
        एसटी महामंडळाच्या अनेक कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात मुंबई मध्ये बेस्ट सेवा बजावली. यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होऊन आपला जीव गमवावा लागला. तर अनियमित व अपुरे वेतन यामुळे काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांची मानसिकता बिघडू नये, त्यांचे संतुलन व्यवस्थित राहावे. कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये. तसेच महामंडळाने राज्यशासनाप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता द्यावा, नियोजित वेतन वेळेवर मिळावे, आणि सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी त्वरित करावी असेही यावेळी बोलताना माने यांनी सभेत सांगितले. राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
     याप्रसंगी एसटी महामंडळातील २८ मृत कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी युनियनचे अध्यक्ष तुकाराम शिरसाठ, जालिंदर पोटे, मोहन गोपनारायण, प्रवीण हिवराळे, संजीव जाधव, सोमेश्वर लोंढे, प्रतिकूल खन्नाडे, मारुती खंडागळे, पंडित सावंत, मंगेश शिंगाडे, दत्ता बांगर, दिलीप काठे, के.डी. भुजबळ, रघुनाथ काळे आदी उपस्थित होते. यावेळी आगारप्रमुखांना कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *