किरण खुडे,
राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांच्या रेंगाळलेल्या आर्थिक बाबतच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात, यासाठी महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांची संयुक्त कृती समिती आक्रमक झाली असून राजगुरूनगर येथे द्वारसभा आंदोलन झाले. एस. टी. कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व सुविधा व इतर मागण्याही यावेळी मांडण्यात आल्या.
या द्वारसभेला गुलाब तिटकारे, सोमनाथ काळे, अजिंक्य फलके, प्रशांत होले, प्रदीप गुट्टे, अमित जगताप, गणेश सांडभोर, मोहन गोपनारायण, विष्णू राठोड, माऊली करंडे, नारायण कंगणे, स्वाती बिराजदार, अर्चना शिंदे, विजया बगाटे, कामगार संघटना अध्यक्ष गजानन सांडभोर, सचिव दत्तात्रय गभाले आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सचिव दत्तात्रय गभाले म्हणाले की, सन २०१६ पासून ३ टक्के वार्षिक वेतनवाढ लागू करण्यात यावी. घरभाडे भत्ता १० टक्के, २० टक्के व ३० टक्के प्रमाणे लागू करण्यात यावा. महागाई भत्त्याची संपूर्ण थकबाकी अदा करावी. एस.टी. कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व सुविधा द्याव्यात आदी मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी हि द्वारसभा महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी कृती समितीच्या वतीने घेण्यात आली आहे.
