अनिल साळवे,

परभणी (हवेलीनामा प्रतिनिधी)

परभणी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी दुर्घटना समोर आली असून मानवत तालुक्यात यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिराचा सभा मंडप अचानक कोसळला यात ३० ते ४० जण दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही दुर्दैवी घटना शनिवार 20 जून 2026 रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाकडून मृत व्यक्तींच्या कुटुंबातील नातेवाईकांना ५ लाखाची मदत जाहीर केली आहे.

यशवाडी येथील हनुमान मंदिर हे अत्यंत जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान मानले जाते. केवळ परभणीच नव्हे, तर संपूर्ण राज्यभरातून हजारो भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. आज शनिवारचा दिवस असल्याने मंदिरात दर्शनासाठी नेहमीप्रमाणे मोठी गर्दी झाली होती.मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराच्या या सभामंडपाचे काम सध्या प्रगतीपथावर होते. दुपारच्या सुमारास अचानक हा नव्याने बांधण्यात येत असलेला सभामंडप कोसळला. मंडप कोसळल्याचा मोठा आवाज होताच परिसरात एकच खळबळ आणि पळापळ झाली. या दुर्घटनेच्या वेळी दर्शनासाठी आलेले ३० ते ४० भाविक ढीगऱ्याखाली दबले गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस अधिकारी आणि स्थानिक यंत्रणा तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका पाचारण करण्यात आल्या असून, वैद्यकीय पथकेही तैनात करण्यात आली आहेत.

या भीषण दुर्घटनेनंतर राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर तात्काळ हालचाली सुरू झाल्या आहेत. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेतली असून त्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून तातडीने सर्व आवश्यक मदत यंत्रणा आणि क्रेन घटनास्थळी पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनीही प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बचावकार्याला गती देण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना सुरक्षित बाहेर काढणे हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट असून, संपूर्ण जिल्हा यंत्रणा मानवतकडे रवाना झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *