किरण खुडे

राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : चासकमान धरणातील पाणी पातळी प्रचंड प्रमाणात खालावल्यामुळे तब्बल ३४ वर्षांपूर्वी पाण्याखाली गेलेले जुने वाडा गाव पुन्हा एकदा पाण्याच्या वर आले आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे आणि पावसाच्या विलंबाने धरणाने तळ गाठल्यामुळे हा ऐतिहासिक इतिहास पुन्हा एकदा जिवंत झाला आहे. पाण्याखालून वर आलेले मंदिरांचे कळस, जुन्या घरांचे अवशेष, दगडी वास्तू आणि गावाची ओळख जपणाऱ्या खुणा पाहून अनेक विस्थापितांच्या डोळ्यांत नकळत अश्रू दाटून आले.

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील एकेकाळचे मुख्य व्यापारी केंद्र असलेले जुने वाडा गाव सन १९९२ मध्ये चासकमान धरणाचा पूर्ण क्षमतेने पाणीसाठा सुरू झाल्यानंतर जलाशयाखाली गेले. परंतु गाव पाण्यात गेले तरी त्याच्या आठवणी मात्र आजही गावकऱ्यांच्या मनात जशाच्या तशा जिवंत आहेत.

भामनेर आणि भिमनेर खोऱ्यातील सुमारे ५२ गावे व वाड्या-वस्त्यांसाठी हे गाव व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. तांदळाची मोठी बाजारपेठ म्हणून या गावाची ओळख होती. खेड, आंबेगाव, जुन्नर, मावळ, शिरूर आणि कर्जत परिसरातून व्यापारी येथे तांदूळ खरेदीसाठी येत असत. दुग्ध व्यवसाय, भाजीपाला आणि पारंपरिक बाजारपेठेमुळे गावाची आर्थिक घडी मजबूत होती.

यंदा धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात खालावल्याने पाण्याखाली गेलेल्या गावच्या स्मृती पुन्हा समोर आली आहे. लक्ष्मी नारायण, गणपती, दत्त, श्रीराम, शनी, ग्रामदैवत धर्मराज, मारुती, विठ्ठल-रखुमाई यांसह अनेक प्राचीन मंदिरांचे दर्शन पुन्हा घडत आहे. विशेष म्हणजे, सुमारे सव्वीस वर्षे पाण्याखाली राहूनही ब्राम्हणवाड्यातील श्री भीमाशंकर मंदिर आजही दिमाखात उभे असल्याचे पाहून नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

त्यावेळी हजारो एकर शेती आणि जंगल पाण्याखाली गेल्याने स्थानिकांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला होता. आता जलाशयाने तळ गाठल्याने जुनी घरे, मंदिरे आणि वास्तूंचे अवशेष उघडे पडले आहेत. पुनर्वसित गावांतील लोक आपल्या पूर्वजांच्या भूमीला भेट देत आहेत.

चासकमान धरण बांधण्यापूर्वी वाडा परिसरात समृद्ध गावे वसली होती. अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले, तरीही पाणी ओसरल्यावर मातीची ओढ रहिवाशांना आपल्या मूळ भूमीकडे खेचून आणते. सध्या घरांचे पाये, भिंती, मंदिरांचे भग्नावशेष स्पष्ट दिसत असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहत आहेत. हे ठिकाण केवळ दर्शनाचे नव्हे तर इतिहास जागृत करणारे केंद्र बनले आहे.

जुने वाडा निवासी ग्रामस्थ आपल्या कुटुंबीयांसह आणि नव्या पिढीला घेऊन या ठिकाणी भेट देत आहेत. काही जण आपल्या मुलांना दाखवत आहेत – “हेच आमचं गाव… इथे आमचं घर होतं… इथे बाजार भरायचा… इथे आम्ही खेळायचो…इथे यात्रेचा बैलगाड्यांचा घाट भरायचा .. ”

ते बालपणीचे दिवस, गावातील सण-उत्सव, देवळातील घंटानाद, नात्यांची ऊब आणि गावपणाची ओढ पुन्हा एकदा प्रत्येकाच्या मनात जागी झाली आहे.

याबाबत बोलताना जिल्हा परिषद सदस्य समीर काळूराम सुपे म्हणाले, “जुन्या वाडा गावात जे प्रेम, आपुलकी आणि एकी अनुभवायला मिळत होती, ती भावना आजही मनातून गेली नाही. घरं गेली, माणसं विखुरली; पण गाव मनातून कधीच गेलं नाही.”

धरणाने विकासाचा मार्ग दिला, पण त्या बदल्यात अनेकांनी आपली मुळे पाण्याखाली जाताना पाहिली. आता पाणी ओसरताच जुनं गाव पुन्हा दिसू लागलं आणि अनेकांच्या मनातील आठवणींचा बांधही फुटला. गाव बुडालं… पण वाडा गावच्या आठवणी अजूनही जिवंत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *