अतुल देशपांडे,
सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) सस्तेवाडी (ता. फलटण) येथे फलटण रस्त्यावर लोंढे करून एकाचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी चार तासांमध्ये दोघांना अटक केली आहे. गणेश बाळू मदने (वय ४०, रा. सस्तेवाडी) असे मृताचे नाव असून, रोहन कैलास पवार (वय २०, रा. सोमवार पेठ, फलटण) आणि गणेश शंकर जाधव (वय २२, सध्या रा. सोमवार पेठ, फलटण मूळरा. कलिना, कुंचीकोरवी गल्ली नं. सात, विद्यानगरी, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. गणेश मदने हे अपघातात दुखापत होऊन मृत झाल्याची माहिती फलटण उपजिल्हा रुग्णालयाकडून ग्रामीण पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर तेथे रक्ताचे थारोळे दिसून आले. मात्र, मृत गणेश मदने यांची मोटारसायकल साइड स्टॅण्डवर फलटण बाजूकडे तोंड करून सुस्थितीत उभी असल्याचे व तिच्या स्वीचलाच चावी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. ही
विसंगती हेरून पोलिसांनी मृताच्या नातेवाइकांकडे अधिक विचारपूस केली. तेव्हा मृत गणेश मदने याची त्याच्या शेतात काही वेळापूर्वी ससे पकडण्यासाठी आलेल्या दोन अनोळखीबरोबर भांडणे झाल्याचे त्यांना समजले. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास निर्जनस्थळी घडल्यामुळे तांत्रिक तपासास मर्यादा येत होत्या. तरीही मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गोपनीय बातमीदार व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे केवळ चार तासांमध्ये रोहन पवार आणि गणेश जाधव या दोन संशयितांना परराज्यात परागंदा होण्याच्या तयारीत असताना त्यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलिस उपअधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांच्या नेतृत्वात केलेल्या या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे,
गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक दीपक पवार, पोलिस उपनिरीक्षक मच्छिंद्र पाटील, महिला पोलिस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण, पोलिस अंमलदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, वैभव सूर्यवंशी, महादेव पिसे, कल्पेश काशीद, अमोल देशमुख व तुषार नलवडे यांनी सहभाग घेतला होता. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असून, पोलिस निरीक्षक संदीप जगताप पुढील तपास करत आहेत.
