किरण खुडे,

राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : माजी आमदार व खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष साहेबरावजी बुट्टेपाटील यांच्यामुळे ५० वर्षांपूर्वी खेड तालुक्यात हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या रूपाने शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि ज्ञानगंगा तालुक्याच्या खेडोपाडी पोचली. त्यामुळे साहेबराव बुट्टेपाटील हे खेड तालुक्यातील शिक्षणक्रांतीचे जनक असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. प्राजक्ता झेंडे यांनी केले.‌ त्या

साहेबरावजी बुट्टेपाटील यांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी संस्थाध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, राष्ट्रवादीच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा ॲड. राजमाला बुट्टेपाटील, संचालक बाळासाहेब सांडभोर, सतीश नाईकरे, बळवंत डांगले, सुरेश टाकळकर, प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे, डॉ. शिल्पा जगताप, उपप्राचार्य प्रा. व्ही.बी. दौंडकर, प्रबंधक नारायण शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

ह.भ.प. प्राजक्ता झेंडे यांनी बोलताना साहेबरावजी बुट्टेपाटील यांच्या जीवन कर्तृत्वाला उजाळा दिला. त्यांचे व्यक्तिमत्त्व संवेदनशील, समाजशील व त्यागी होते. राजकारणात संधी असतानाही त्यांनी राजकीय पद व प्रतिष्ठेचा त्याग केला.‌ शिक्षणासारख्या आवडीच्या क्षेत्रात काम करत राहिले. त्यांचे कार्य त्यांचे सुपूत्र देवेंद्र बुट्टे पाटील तितक्याच निष्ठेने पुढे घेऊन जात असल्याचे त्या म्हणाल्या.

या प्रसंगी कु. तनिष्का शेलार, कु. साक्षी शिवेकर या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या वतीने क्रीडाज्योत, एनसीसी पथकाकडून मानवंदना, सर्वधर्मीय प्रार्थना, विज्ञान प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, हस्ताक्षर स्पर्धा, भारतीय संविधान जागृती प्रश्नमंजुषा, सरस्वती पूत्र या भीत्तिपत्रकाचे अनावरण आदी उपक्रम तर साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयाच्या वतीने फर्मेंटोपिया, अन्नधान्य प्रदर्शन व रक्तगट आणि रक्तदाब तपासणी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले

राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ९१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. पुण्याच्या ससून रक्तपेढीचे समाजसेवा अधीक्षक अरूण बर्डे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अक्षय पाटील, डॉ. पायल मुळे, डॉ. अंजली कनावर सहभागी झाले. याप्रसंगी वसुंधरा संवर्धनाची शपथ घेण्यात आली. सूत्रसंचालन प्रा. धनंजय बो‌ऱ्हाडे यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *