अतुल देशपांडे यांजकडून,

स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी,सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना काळे फासल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. माझ्यावर हल्ला करणाऱ्याच्या हातात कोयत्यासारखी शस्त्रं होती, असा गंभीर आरोप विनोद कुलकर्णीनी बोलताना केला. हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव संदीप जाधव असे असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.विनोद कुलकर्णी यांच्यावर काळे फासण्याचा हल्ला करताना हा जाधव मोठ्यामोठ्याने जनगणमन हे राष्ट्रगीत ही तोंडाने म्हणत होता .यावेळी आजूबाजूला उभे असलेल्या साहित्यिक, लेखक तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचे चित्र दिसून आले

तुला संपवतो असे म्हणत चेहऱ्यावर फेकला काळा पदार्थ

विनोद कुलकर्णी यांनी बोलताना सांगितले की, “मी साहित्य संमेलनात पुस्तक प्रकाशन कार्यक्रम करून कार्यक्रमस्थळावरून बाहेर पडत होतो. यावेळी अज्ञात व्यक्तीने माझ्या डोळ्यात काळा पदार्थ टाकला. त्यांच्याकडे कोयत्यासारखी शस्त्रही होती. तुला संपवतो अशी भाषाही यावेळी हल्लेखोराने वापरली. यावेळी काळा काही तरी डोळ्यात गेल्याने मला काहीही दिसले नाही. उपचार घेऊन मी पुन्हा संमेलनस्थळी दाखल झालो आहे.”

“मी सरकारविरोधात, हिंदी सक्तीविरोधात भूमिका घेतली आहे. संमेलन होऊ देणार नाही अशा धमक्याही अनेक जणांनी दिले होत्या परंतु मराठी भाषेसाठी आम्ही झटत आहोत आणि भले बेहेत्तर माझे प्राण गेले तरी मी हा लढा सुरूच ठेवणार आहे आमच्या सरकार व वेगवेगळ्या संघटनांविरोधात मराठी भाषेसाठी लढाया सुरू आहेत. कोणत्या कारणातून माझ्यावर हल्ला झाला हे मला समजून आलेले नाही,” असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. विचाराची लढाई विचाराने केली तरच ते योग्य आहे आज मी माझ्या मित्रासोबत प्रकाशन समारंभ आटोपून स्टेजवरून खाली उतरत असताना हा प्रकार घडला आहे हल्ला केला की कोणी करायला लावला आहे हे माहिती नाही. पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करून मला न्याय देतील, असा विश्वासही कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *