- अतुल देशपांडे,
छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी, सातारा (हवेलीनामा)
छत्रपती संभाजीराजेंवरील माझे ‘संभाजी’ हे पुस्तक २००६ मध्ये प्रकाशित झालेले आहे. दोन-तीन पिढ्यांनी हे पुस्तक वाचलेले आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या माझ्या तरुण मित्रांना यामध्ये काही शंका असेल किंवा पुस्तकात अनावधानाने माझ्याकडून चुकून काही इकडे, तिकडे झाले असेल, तर मोठ्या मनाने ते तत्काळ मागे घेण्याची माझी तयारी आहे, असे स्पष्ट मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.
संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्याशी पत्रकारांनी संवादसाधला. कादंबरीवर संभाजी ब्रिगेडने घेतलेल्या भूमिकेबाबत विचारले असता ते म्हणाले, “आंदोलक माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. माझी कादंबरी २००६ मध्ये प्रकाशित झालेली आहे. त्याच्या साडेतीन हजार प्रतींचे वितरण झालेले आहे. दोन-तीन पिढ्यांनी हे पुस्तक वाचलेले आहे. संभाजीराजे हे माझ्या काळजाचे बळ आहे.”संभाजी ब्रिगेडच्या माझ्या तरुण मित्रांना माझ्या कादंबरीत काही शंका असेल तर त्यांच्याशी समोरासमोर बसून चर्चा करण्याची माझी तयारी आहे, तसेच या कादंबरीत अनावधानाने माझ्याकडून चुकून काही इकडे तिकडे झाले असेल तर ते मी मोठ्या मनानं तत्काळ मागे घेण्यास तयार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
