प्रवीण कांबळे,
खामगाव फाटा (हवेलीनामा प्रतिनिधी)
उरुळी कांचन – यवत मध्ये दरम्यान सोलापूर महामार्गावरील खामगाव फाटा येथे स्विफ्ट व होंडा सिटी मोटार यांच्यात जोरदार अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली.

खामगाव फाटा हा अत्यंत वर्दळीचा असून येथून खामगाव, दहिटणे, गडामोडी, यादववाडी, तांबेवाडी व राहू या गावांकडे जाण्या-येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. मात्र पुणे–सोलापूर महामार्गावरून येणारी वाहने वेगात असल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचे चित्र आहे.
या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. खामगाव फाटा, खामगाव, गडामोडी, यादववाडी व तांबेवाडी येथील ग्रामस्थांनी एकमुखाने मागणी केली आहे की, खामगाव फाट्यावर तात्काळ वाहतूक सिग्नल बसवावा. महामार्गावरील वाहनांचा वेग कमी करण्यासाठी सूचक फलक व स्पीड ब्रेकर बसवावेत, रात्री स्पष्ट दिसण्यासाठी रिफ्लेक्टर व प्रकाशयोजना करावी

या उपाययोजना केल्यास पुणे–सोलापूर महामार्गावरील वाहनचालकांना पुढे फाटा असल्याचे समजेल, वेग कमी होईल आणि भविष्यातील गंभीर अपघात टाळता येतील, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
