किरण खुडे

राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : हडपसर दुर्गसंवर्धन परिवाराच्या पथकातील एका तरुणाचा भोरगिरी (ता. खेड) किल्ल्याच्या पायथ्याशी ओढ्यात पडून मृत्यू झाला. ओंकार देविदास लोहार (वय २१, रा. हडपसर, पुणे) असे त्याचे नाव आहे.भोरगिरी किल्ल्यावर दुर्गसंवर्धनासाठी गेलेल्या हडपसर दुर्गसंवर्धन परिवाराच्या ३० सदस्यांच्या पथकातील हा तरुण होता.

अनिल महादेव सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे पथक शनिवारी (दि. १३) रात्री भोरगिरी येथे पोहचले. तेथे मुक्काम करून रविवारी (दि. १४) सकाळी साडेसात वाजता पथकाने किल्ल्यावर जात साफसफाईचे काम केले. दुपारी सुमारे अडीच वाजता किल्ल्यावरून खाली उतरल्यानंतर ओंकार ओढ्यात पडला. पथकातील इतर सदस्यांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले. उपचारांसाठी वाडा येथील खासगी रुग्णालयात नेले. तेथुन पुढील उपचारांसाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *