किरण खुडे
राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : वाफगाव (ता.खेड) येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालयात एक दिवसीय अपुर्व विज्ञान मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी रांगोळी स्पर्धा व ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शन पाहण्यासाठी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते
या विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक नामदेव डोके यांनी केले. प्रदर्शनात विद्यालयातील पाचवी ते दहावी मधील सर्व विद्यार्थ्यांनी अपूर्व विज्ञान मेळावा, रांगोळी स्पर्धा व ग्रंथ प्रदर्शन यामध्ये नाव नोंदणी करून प्रत्यक्ष प्रयोगामध्ये सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी पाणी व्यवस्थापन, उर्जा बचत व हवा प्रदूषण यावर प्रयोग सादर केले. विद्यालयातील विज्ञान शिक्षक इम्रान मुलानी, दत्तात्रय पाचपुते यांनी विज्ञान मेळाव्यासंदर्भात तसेच विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत प्रयोगाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी वाफगावच्या सरपंच मोनिका नितीन लंगोटे, व्यवस्थापन समितीचे काळूराम लंगोटे, अश्विनी सुतार, साधना कराळे , ज्योती मोरे, रसिका वाफगावकर व पालक उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक नामदेव डोके यांनी पर्यावरणात होणारे बदल प्रदूषण थांबवणे ही काळाची गरज यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे ग्रंथपाल सुधीर बाणखिले, शिक्षक व्यंकटेश चव्हाण, माणिक पवार, सुनील कातोरे, तुषार गाडेकर, सारिका मोहरे, माया भोर, अमृता सोनार, पुनम सानप उपस्थित होते. प्रवीण गोडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर श्रीमती सोनल कराळे यांनी आभार मानले.
