पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रजासत्ताक असलेल्या आपल्या भारतात आणखी मतदानाचे महत्त्व पाहिजे तेवढ कळलेलंच नाही.लोकसभा निवडणुकीत सरासरी 60टक्केच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला म्हणजे जवळपास 40 टक्के मतदार मतदानाला गेले नाहीत. लोकशाही भक्कम करायची असेल तर मतदानाचा टक्का वाढला पाहिजे.
सर्व राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारासाठी प्रचार करतात परंतू मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून कोणीच प्रयत्न करत नाहीत. ही केवळ निवडणूक आयोगाची जबाबदारी असल्याचे दिसून येते.देशातील प्रत्येक मतदाराने हे आपले आद्य कर्तव्य असल्याचे समजून घेणे आवश्यक आहे.
सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी चालू आहे प्रचाराचा धुराळा उडतोय परंतू मतदार राजाला मतदानासाठी घराबाहेर कसे काढता येईल याचा प्रयत्न आवश्यक आहे.मतदानाच्या दिवशी सर्व कार्यालयास पगारी सुट्टी देण्यात येते.अनेक सुशिक्षित मतदार या सुट्टीत कुटुंबासह पर्यटनस्थळी निघून जातात हा निव्वळ बेजबाबदारपणा आहे.
अनेकांनी यावर एक शक्कल अमलात आणण्याचा सल्ला दिला आहे.मतदान केल्याचा पुरावा सादर केल्या खेरीज ती सुट्टी ग्राह्य धरु नये.हा एक उपाय असू शकतो परंतू आपण लोकशाहीची भाषा करतो आणि मतदान करण्यात मागे राहतो.विशेष म्हणजे आपण निवडून दिलेले प्रतिनिधि आपल्यासाठी सार्वजनिक हिताचे निर्णय घेतात अनेक जण यावर टिका करतात जर आपण निवडणूक प्रक्रियेत भाग घेत नसू तर यावर भाष्य करण्याचा आपला अधिकार कसा असू शकतो.आपल्या विचाराचा माणूस त्या ठिकाणी असावा वाटत असेल तर मतदान करा !
