पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे वाहतूक सेवेवर परिणाम झाला असून महामार्गावर तुरळक बस धावताना दिसून येत आहेत. एस टी कर्मचाऱ्यांनी सन २०२१मध्ये मोठे आंदोलन केले होते. त्यावेळी जवळपास दोन महिने बसची चाके थांबली होती. त्यानंतर आता पुन्हा राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर गेली आहेत. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा संप पुकारला आहे. आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा, असा इशारा देत एसटी कर्मचारी संघटनेने आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. ऐन गणेशोत्सव काळात संप पुकारल्याने गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसह सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
पुणे विभागात या संपास मोठा प्रतिसाद मिळत असून शहरातील स्वारगेट शिवाजीनगर वल्लभनगर आगारात सेवा बंद आहे तसेच ग्रामीण भागातील सासवड,भोर, राजगुरुनगर आदी भागातील डेपोमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे.

विदर्भातील सर्व आगारातील वाहतूक सुरू आहे. तेथे बंदचा इतका प्रभाव दिसून येत नाही. मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक आगार बंद आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील वाहतूक व्यवस्थित सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, बारामती, तळेगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. सांगली जिल्ह्यात मिरज, जत, पलूस हे आगार पूर्णतः बंद आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील कराड, वडूज, महाबळेश्वर हे आगार पूर्णतः बंद आहेत.खान्देशात नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव, पेठ हे आगार तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. बाकीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू आहे.
