पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) महावितरणच्या सेवेचा केंद्रबिंदू हा वीजग्राहकच आहे. त्यांना दर्जेदार व तत्पर सेवा देण्यासाठी पुणे परिमंडलामध्ये आदर्श मानदंड निर्माण करा आणि स्वतःसोबतच ग्राहकांच्या वीजसुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या असे आवाहन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी चाकण येथे सोमवारी (दि. ४) ‘लाइनमन दिना’च्या कार्यक्रमात केले.

 

राजगुरुनगर व मंचर विभागाच्या वतीने चाकण येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित ‘लाइनमन दिना’च्या कार्यक्रमात मुख्य अभियंता श्री. पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अधीक्षक अभियंता श्री. युवराज जरग, सहायक महाव्यवस्थापक ज्ञानदा निलेकर, कार्यकारी अभियंता अमित कुलकर्णी, शांताराम बांगर, राजेंद्र येडके, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर यांची उपस्थिती होती.

 

मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले, अत्यंत महत्वाच्या पण तेवढ्या जोखमीच्या वीजक्षेत्रात महावितरणचे महिला व पुरुष तांत्रिक कर्मचारी ग्राहकांना सेवा देत आहेत. ‘तौक्ते’, ‘निसर्ग’ ही चक्रीवादळे आणि कोरोना संकटकाळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता खडतर काळात जिगरबाज ग्राहकसेवेचा प्रत्यय दिला आहे. त्यामुळे महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांचा सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी वीजसुरक्षेबाबत प्रबोधन केले तर श्री. जयवंत श्रीखंडे यांनी प्रथमोपचारासंबंधी माहिती दिली. तसेच जनमित्रांनी देखील प्रातिनिधीक स्वरुपात मनोगत व्यक्त केले.

 

त्यापूर्वी ‘लाइनमन दिना’निमित्त चाकण शहरातील विविध मार्गावर सकाळी बाईक रॅली काढण्यात आली व त्याद्वारे वीजसुरक्षेचा जागर करण्यात आला. या रॅलीत मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच डॉ. दुधभाते नेत्रालयाकडून जनमित्रांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली. कार्यक्रमाला अभियंते, अधिकारी व तांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *