राजगुरूनगर (हवेलीनामा ऑनलाइन) खेड तालुक्याच्या पूर्व भागातील खरपुडी गावचे सरपंच विशाल अशोक काशिद यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला यात चारचाकी मोटारीची काच फोडून पिस्तुल रोखले मात्र, सरपंच काशिद यांनी जोरात मोटार चालविल्यामुळे यातून बचावले आहेत.
या घटनेने खरपुडी परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.याबाबत अज्ञात चार व्यक्तीविरूध्द खेड पोलिस ठाण्यात त्यांनी फीर्याद दिली आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की,खरपुडीचे सरपंच विशाल काशिद व त्यांचा मित्र हे गुरुवारी (दि. १६ ) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये जेवण करून घरी जात होते. खेड – कनेरसर मार्गावरून ते खरपुडी गावालगत कच्या रस्त्याने मोटारीतून घरी जात असताना दोन दुचाकीवरून चार व्यक्तींनी येऊन काशिद यांच्या चारचाकीला दुचाकी आडव्या लावल्या.
चौघांनी तोंडाला रुमाल बांधले असल्यामुळे सरपंच काशिद यांना कोणीही ओळखू आले नाही. दरम्यान, एकानं लाकडी दांडक्यानं गाडीची काच फोडण्याच्या प्रयत्न केला. तो असफल झाल्यानंतर दगडाने काच फोडली. “तुला लई माज आला आहे. तुझा माज जिरवतो” असं म्हणून खिशातून पिस्तुल काढून सरपंच काशिद यांच्यावर रोखला. प्रसंगावधान राखून काशिद यांनी चारचाकी जोरात चालवल्यामुळे या घटनेतून ते बचावले आहेत.
या घटनेने खरपुडी परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत सरपंच काशिद यांनी अज्ञात चार जणांविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असुन पोलिस या घटनेचा तपास करित आहे. खरपुडी गावात लाखो रुपयांची विकासकामे सुरू आहेत. हे विरोधकांना पाहवत नसल्यामुळे राजकीय वैमन्यस्यातुन माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला असल्याचे सरपंच काशिद यांनी सांगितले.
