पुणे |हवेलीनामा वृत्तसमुह | सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांना सेवेच्या निर्धारित कृती मानकांप्रमाणे सेवा देण्यासाठी महावितरण अतिशय गंभीर आहे. त्यानुसार सुरळीत वीजपुरवठा, नवीन वीजजोडणी, अचूक बिलिंग व तक्रारींचे निराकरण यामधील तत्परतेत हयगय खपवून घेतली जाणार नाही असा इशारा महावितरणचे संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांनी गुरुवारी (दि. २) आढावा बैठकीत दिला.
पुणे परिमंडल अंतर्गत ग्राहकसेवांसह विविध मुद्द्यांवरील कामकाजाबाबत सर्व मंडल, विभाग व उपविभाग कार्यालयांचा ‘प्रकाशभवन’ येथे आढावा घेताना संचालक श्री. संजय ताकसांडे बोलत होते. यावेळी पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता राजेंद्र पवार (पुणे परिमंडल) व संजय पाटील (देयके व महसूल) यांची प्रमुख उपस्थिती होती.
संचालक (संचालन) संजय ताकसांडे म्हणाले की, वीजग्राहकांना ‘इज ऑफ लिव्हिंग’प्रमाणे सेवा देण्यास महावितरणने अतिशय गंभीरपणे प्रारंभ केला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची तत्परता अतिशय़ महत्त्वाची आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने याची नोंद घ्यावी व त्याप्रमाणे ग्राहकांना सेवा देण्यात कोणतीही कुचराई करू नये. यासोबतच गेल्या काही दिवसांमध्ये वीजबिलांची थकबाकी वाढत असल्याचे दिसून येत आहे. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे चालू वीजबिलांसह थकबाकीची १०० टक्के वसूली करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
ताकसांडे पुढे म्हणाले की, शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० ची वेगवान अंमलबजावणी सुरु केली आहे. पहिल्या टप्प्यात पुणे परिमंडलातील ५६ उपकेंद्रांची या योजनेसाठी निवड झाली असून येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत ही सर्व उपकेंद्र अद्ययावत करणे, तांत्रिक दुरुस्ती व सुधारणा, स्थापत्य कामे, इतर सक्षमीकरणाचे विविध कामे युद्धपातळीवर पूर्ण करावेत.
अचूक बिलिंगसाठी केलेल्या उपाययोजनांमुळे वीजग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण लक्षणीय कमी झाले आहे. परंतु प्रत्यक्षात वीजवापर मोठ्या प्रमाणात होत असताना अचूक रीडिंग अभावी किंवा सरासरी वीजबिलांद्वारे चुकीचे बिल देण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. यासह बिलिंगबाबत ग्राहकांच्या तक्रारींचे विनाविलंब निराकरण करावे असेही ताकसांडे यांनी स्पष्ट केले.
कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्यांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोटेशनची रक्कम भरलेल्या पुणे परिमंडलातील प्रलंबित कृषी वीजजोडण्या येत्या नोव्हेंबर अखेरपर्यंत कार्यान्वित कराव्यात. रब्बी हंगाम सुरु होत असल्याने कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे नादुरुस्त तसेच जळालेले रोहित्र तातडीने बदलण्यासाठी अतिरिक्त रोहित्र तयार ठेवावेत असे संजय ताकसांडे यांनी स्पष्ट केले. या बैठकीला अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, युवराज जरग, संजीव राठोड यांच्यासह सर्व विभागांचे कार्यकारी अभियंता, उपविभाग कार्यालयप्रमुख अभियंता व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
